Raghuram Rajan On Indian Economy: भारतासाठीच नव्हे तर जगासाठी पुढील वर्ष अधिक आव्हानात्मक, मंदीच्या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांचा इशारा
Raghuram Rajan On Indian Economy: जगभरातील अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असताना रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर आणि अर्थ तज्ज्ञ रघुराम राजन यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे.
Raghuram Rajan On Indian Economy: येणारे पुढील वर्ष हे भारतासाठी नव्हे तर जगातील अर्थव्यवस्थेसाठी अधिक आव्हानात्मक असणार असल्याचा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी दिला. देशाच्या आर्थिक विकासासाठी अनेक प्रकारे सुधारणा कराव्या लागणार असल्याचे त्यांनी म्हटले. निम्न मध्यमवर्गीयांना केंद्रीत करून काही धोरणे आखणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.
रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन हे बुधवारी, भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांच्यासोबत चर्चा करताना देशासमोरील आर्थिक आव्हानांचा उहापोह केला. रघुराम राजन यांनी म्हटले की, कोरोना महासाथीच्या काळात मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्गाला मोठा फटका बसला. या वर्गाला विशेष लक्षात घेऊन धोरण आखणे गरजेचे आहे. लघु उद्योग आणि मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनी हरीत ऊर्जा वापरावरही भर दिला.
वाढत्या आर्थिक असमानतेच्या आव्हानांवर, रघुराम राजन यांनी भाष्य करताना म्हटले की, कोरोना महासाथीच्या काळात घरून काम करत असल्याने उच्च मध्यमवर्गीयांचे उत्पन्न वाढले. परंतु कारखान्यांमध्ये काम करणाऱ्यांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे महासाथीच्या काळात आर्थिक असमानता वाढली असल्याचे दिसून आले.
Crypto, Stocks, Next-Gen Revolutions, and unlocking India's full potential!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 14, 2022
A discussion with Raghuram Rajan on ideas to make India a true global super-power.https://t.co/kRYglwAKmN pic.twitter.com/BnQbT1Vggv
रघुराम राजन यांनी म्हटले की, श्रीमंतांना कोणतीही आर्थिक अडचण जाणवली नाही. गरीब वर्गाला रेशन आणि इतर गोष्टींची मदत मिळाली. पण, निम्न मध्यमवर्गाचे मोठे नुकसान झाले. नोकऱ्या नसल्याने बेरोजगारी वाढली आणि त्याचा परिणाम झाला असल्याचे सांगत त्यांनी सरकारने या निम्नमध्यमवर्गासाठी धोरण आखावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
राहुल गांधी यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान राजन म्हणाले की, देशात पुढील क्रांती सेवा क्षेत्रात होऊ शकते. देशात नवीन प्रकारची हरितक्रांती घडत असून हवामान बदलाचे आव्हान लक्षात घेऊन पवनचक्की उभारणे आणि पर्यावरण पूरक इमारतींमध्ये भारत अग्रसेर होऊ शकतो असेही त्यांनी म्हटले.
भारताच्या आर्थिक स्थितीबाबत काय म्हटले?
भारताच्या आर्थिक स्थितीबाबत बोलताना रघुराम राजन यांनी म्हटले की, पुढील वर्ष अधिक आव्हानात्मक असणार आहे. जगभरात विकासाची गती मंदावली आहे. भारतावरही याचा परिणाम होणार आहे. निर्यात थोडी कमी झाली आहे. महागाईदेखील भारताच्या विकासासाठी अडथळा ठरत आहे. बेरोजगारी वाढत असून आता खासगी क्षेत्राने नोकऱ्यांसाठी पुढे यावे असे आवाहन राजन यांनी केले. सगळ्यांनाच सरकारी नोकरी मिळू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानाचा योग्य वापर सुरू झाल्यास कृषी क्षेत्रातही रोजगार निर्मिती होऊ शकते असेही त्यांनी म्हटले.