नवी दिल्ली: देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने जाहीर केलेल्या तारखांनुसार, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 29 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.


अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन टप्प्यात होणार असून त्याचा पहिला टप्पा हा 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान असेल. या अर्थसंकल्पाचा दुसरा टप्पा हा 8 मार्च ते 8 एप्रिल या दरम्यान असेल. या संबंधिच्या मंत्रिमंडळाच्या समितीने ही शिफारस केली होती.


Budget 2021: अर्थसंकल्पासंदर्भात वाजपेयी सरकारने केला होता 'हा' मोठा बदल, जाणून घ्या...


लोकसभा सचिवालयाने काढलेल्या एका निवेदनानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. त्यानंतर एक फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.


संसदेच्या स्थायी समितीला विविध मंत्रालयांनी केलेल्या अनुदान मागण्यांवर विचार करण्यासाठी 15 फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्या सत्राला स्थगिती देण्यात येईल आणि 8 मार्च रोजी दुसऱ्या टप्प्यातील सत्राला सुरुवात होईल.


मोदी सरकारचं यंदाचं बजेट पेपरलेस, बजेट न छापण्याचा निर्णय कशामुळे घ्यावा लागला?


संसदेच्या या अधिवेशनाच्या दरम्यान कोविड-19 संबंधी सर्व नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन घेण्यात आलं नव्हतं. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे सरकारने हिवाळी अधिवेशन घेणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यावर विरोधी पक्षांनी टीका केली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तसेच अन्य महत्वाच्या प्रश्नावंर चर्चा करण्याची केंद्र सरकारची इच्छा नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केली होती.


स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्प छापण्यात येणार नाही असं सरकराने स्पष्ट केलंय. ते केवळ डिजीटल स्वरुपात उपलब्ध असेल. बजेटची साँफ्ट कॉपी खासदार आणि इतर संबंधितांना वाटली जाईल. कोरोनामुळे हा निर्णय घेतल्याचा सरकारचा दावा आहे.


आगामी अर्थसंकल्प हा या पूर्वीच्या अर्थसंकल्पांपेक्षा वेगळा असणार आहे असं वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं होतं. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या की, "सरकार कोरोनामुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देणाचा प्रयत्न करणार आहे. आरोग्य, मेडिकल रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट आणि टेलिमेडिसिन या क्षेत्रांसाठी एक चांगलं वातावरण विकसित करणं महत्वाचं आहे. याचसोबत रोजगाराच्या आव्हानाला नव्या दष्टीकोनातून बघायला हवं, व्होकेशनल ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंट या विषयांवर भर देणं गरजेचं आहे.'


...म्हणून यंदाचा अर्थसंकल्प छापला जाणार नाही!