बीड : आजच्या दिवशी सौभाग्यवती महिला या वाण लूटून संक्रांत साजरी करत असतात. बीडमध्ये मात्र विधवा महिला एकत्र येऊन थाटात संक्रांत सणादिवशी वाण लुटण्याचा कार्यक्रम करतात. पतीच्या निधनानंतर पदरात पडलेल्या वैधव्यावर मात करत बीडच्या आधुनिक सावित्रींनी रूढी परंपरेचं बंधनं झुगारलं. वैधव्य आलेल्या महिलांनी संक्रांतीच्या मोठ्या थाटात साजरा केला.
अपघाताने ऐन तारूण्यातच वैधव्य आलेल्या महिलेला समाजात दुय्यम स्थान दिले जाते. शुभ कार्य असो की सण उत्सव यात महिलांचा विशेष मकर संक्राती सारखा सण असो, यावेळी मिळणारी वागणूक ही अपमानची असते. अनेक ठिकाणी हेटाळणीच्या नजरेतून पाहिले जाते तर काही ठिकाणी अपशकूनी समजलं जातं. अशा बुरसटलेल्या विचारांना छेद देण्याचे मोठे धाडस बीडच्या शिक्षिका मनिषा जायभाये या रणरागिनींनी केले आहे.
बीडच्या शिरूर तालुक्यातील चुंबळी येथे विधवा 121 महिलांनी एकत्र येत मकर संक्रातीचे वाण लुटले. विशेषत: साडीचोळी भेट आणि तिळगुळ देत संक्रांत साजरी केली. राजमाता जिजाऊ अन् सावित्रीमाई फुले यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात परंपरागत रूढीविरोधात आवाज उठवण्याचे केलेल्या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक होते आहे.
या कार्यक्रमात चुंबळी गावांतील सहभागी महिलांच्या डोळ्यांमध्ये आश्रू तरळत होते. जोडीदार सोडून गेल्याचं दुःख होतेच तर चेहऱ्यावर एक सन्मान मिळाल्याचा आनंद पण होता. अनेक महिला कित्येक वर्षानंतर या अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी एक मुकाने आम्हाला सन्मानानं जगू द्या, आमच्या आयुष्यात वैधव्य हे काय आमच्या इच्छेने आलेले आहे का? असा सवालच जणू त्या करत होत्या.
अपघाताने आमच्या वाट्याला आलेल्या या विधवापणामुळे आम्हाला सार्वजनिक कार्यक्रमात देखील सहभागी होण्याचा अधिकार दिला जात नाही. यामुळे आमची प्रचंड प्रमाणात घुसमट होते. अशा उपक्रमामधून आम्हाला सामाजिक सुरक्षा मिळाल्याचा प्रत्यय येतो असे महिलांनी व्यासपीठावर बोलून दाखवले.