नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सादर होणारा या वर्षीचा अर्थसंकल्प हा ऐतिहासिक असेल. कारण स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पाशी संबंधित कागदपत्रे छापण्यात येणार नाहीत. या वर्षीचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे डिजिटल स्वरुपाचा असेल. पण अर्थसंकल्पात होणारा हा बदल काही पहिला नाही. या आधीही अनेकवेळा अर्थसंकल्पात असे ऐतिहासिक बदल करण्यात आले आहेत. वाजपेयी सरकारच्या काळातही अर्थसंकल्पात एक ऐतिहासिक बदल करण्यात आला होता.


अर्थसंकल्पाच्या बाबतीत गेली कित्येक दशके सुरु असलेल्या परंपरामध्ये बदल करण्याचा प्रकार अनेकवेळा घडलाय. त्यापैकी एक म्हणजे पूर्वी संध्याकाळी पाच वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जायचा. ही परंपरा ब्रिटिश काळापासून सुरु होती. वाजपेयी सरकारच्या काळात, 1999 साली यात बदल करण्यात आला आणि केंद्रीय अर्थसंकल्प हा सकाळी म्हणजे 11 वाजता सादर करण्यास सुरुवात झाली.


...म्हणून यंदाचा अर्थसंकल्प छापला जाणार नाही!


स्वातंत्र्यापूर्वी, ब्रिटिश काळात भारताचा पहिला अर्थसंकल्प हा 7 एप्रिल 1860 साली सादर करण्यात आला होता. जेम्स विल्सन यांनी तो सादर केला होता. त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत ब्रिटिशांच्या वतीनेच आपल्या देशाचा अर्थसंकल्प सादर केला जायचा.


अर्थसंकल्प संध्याकाळी का मांडला जायचा?
ब्रिटिश काळात भारताचा अर्थसंकल्प हा संध्याकाळी पाच वाजता सादर केला जायचा. त्याचा संबंध हा ब्रिटिशांच्या वेळेशी होता. ब्रिटनमध्ये त्यांच्या देशाचा अर्थसंकल्प हा सकाळी 11 वाजता सादर केला जायचा. ग्रीनीच प्रमाणवेळेप्रमाणे भारताची प्रमाणवेळ ही ब्रिटिशांच्या वेळेपेक्षा साडेपाच तास पुढे आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये जर 11 वाजलेले असतील तर भारताच्या प्रमाणवेळेनुसार भारतात उत्तर प्रदेशच्या मिर्जापूरमध्ये साडे चार वाजलेले असतात. म्हणजे भारतातील वेगवेगळ्या शहरात चार ते पाच ही वेळ असते.


मोदी सरकारचं यंदाचं बजेट पेपरलेस, बजेट न छापण्याचा निर्णय कशामुळे घ्यावा लागला?


स्वातंत्र्यापूर्वी भारतात सादर केला जाणारा अर्थसंकल्प हा ब्रिटनमध्ये 'हाऊस ऑफ लॉर्ड्स' आणि 'हाऊस ऑफ कॉमन्स' मध्ये ऐकला जायचा. त्यामुळे ब्रिटिशांची संसद ज्यावेळी सुरु व्हायची, म्हणजे सकाळी 11 वाजता भारतात अर्थसंकल्प सादर केला जायचा. संध्याकाळी अर्थसंकल्प सादर करण्याची सुरुवात ही 1924 साली सुरु करण्यात आली. ही परंपरा स्वातंत्र्यानंतरही कायम ठेवण्यात आली.


वाजपेयी सरकारच्या काळात पहिल्यांदा बदल
सन 1999-2000 सालचा अर्थसंकल्प सादर करताना वाजपेयी सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पहिल्यांदा ही परंपरा खंडीत केली. त्यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. संध्याकाळी पाच वाजता अर्थसंकल्प सादर केल्याने अर्थसंकल्प पूर्ण होण्यास रात्र व्हायची. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी त्या अर्थसंकल्पावर चर्चा केली असायची. कदाचित याच कारणाने यशवंत सिन्हांनी अर्थसंकल्प मांडायची वेळ बदलली आणि इतिहास घडला.


Union Budget 2021: आगामी अर्थसंकल्प हा आधीपेक्षा वेगळा: निर्मला सीतारमण