Pulses Price Hike: केंद्र सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही डाळींचे (Pulses) भाव कमी होण्याचं नाव घेत नाहीत. विशेषत: तूर डाळीच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली आहे. या वर्षभरात तूर डाळ 27 टक्क्यांनी महागली आहे, त्यामुळे उडीद ते मसूर डाळीचे भावही तेजीत आहेत. त्याचबरोबर यंदा पाऊस कमी झाल्याने येत्या काही दिवसांत डाळींच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


तूर डाळीचे भाव गगनाला


देशभरातील किरकोळ किमतींवर दररोज नजर ठेवणाऱ्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या किंमत निरीक्षण विभागाच्या (Price Monitoring Division) आकडेवारीनुसार, 29 ऑगस्ट 2022 रोजी तूर डाळीची सरासरी किंमत 110.66 रुपये प्रति किलो इतकी होती. तुरीच्या डाळीचे भाव एका वर्षात 140.34 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले. म्हणजेच एका वर्षाच्या कालावधीत तूर डाळीच्या दरात 27 टक्के वाढ झाली आहे.


मूग डाळ आणि उडीद डाळही महागली


अन्न ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एका वर्षापूर्वी 29 ऑगस्ट 2022 रोजी मूग डाळीची सरासरी किंमत 102.35 रुपये प्रति किलो होती, जी आता 111.19 रुपये झाली आहे. म्हणजेच एका वर्षात मूग डाळ 8.15 टक्क्यांनी महागली आहे. एका वर्षापूर्वी उडदाची डाळ प्रतिकिलो 108.25 रुपयांना मिळत होती, आता उडीद डाळ 115.02 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे, म्हणजेच उडीद डाळ 6.25 टक्क्यांनी महाग झाली आहे. वर्षभरापूर्वी मसूर डाळीची सरासरी किंमत 92.09 रुपये प्रतिकिलो होती, ती आता 97.16 रुपये किलो झाली आहे. आता चणा डाळीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळत आहे. वर्षभरापूर्वी चणाडाळ 74.15 रुपये किलो दराने उपलब्ध होती, जी आता 77.9 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. म्हणजेच एका वर्षात हरभरा डाळ 5 टक्क्यांनी महागली आहे.


आयातदारांना सूचना


अलीकडच्या काळात तूर आणि उडीद डाळीच्या वाढत्या किमती पाहता सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. सरकारने डाळ आयात करणाऱ्या आयातदारांना कस्टम क्लिअरन्स मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत डाळी बाजारात उतरवण्याचे निर्देश दिले आहेत. कस्टम क्लिअरन्स मिळाल्यानंतर 30 दिवसांपेक्षा जास्त काळ डाळींचा स्टॉक ठेवू नये, डाळींची साठवणूक करू नये, असे निर्देश आयातदारांना देण्यात आले आहेत. यासोबतच दर शुक्रवारी सर्व आयातदारांना विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर तूर आणि उडीद डाळीच्या साठ्याची माहिती देण्यास सांगण्यात आलं आहे.


 'भारत डाळ' या नावाने चणाडाळ विक्रीसाठी बाजारात


ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत डाळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारने चणा डाळ प्रति किलो 60 रुपये आणि 30 किलो पॅकसाठी 55 रुपये प्रति किलो या अत्यंत अनुदानित दराने डाळीची विक्री सुरु केली आहे. सरकारनं 'भारत डाळ' या नावाने चणाडाळ विक्रीसाठी बाजारात आणली आहे. नाफेड, एनसीसीएफ, केंद्रीय भांडार आणि सफलच्या किरकोळ विक्री केंद्रातून भारत डाळीचं वितरण केलं जात आहे. 


सरकारचे प्रयत्न, पण भाव काही उतरेना


प्राइस स्टेबलाइजेशन फंडद्वारे (Price Stabilisation Fund) सरकार हरभरा, तूर, उडीद, मूग आणि मसूर डाळ यांचा बफर स्टॉक ठेवते, जे सरकार किमती नियंत्रित करण्यासाठी लागू करते. सध्या सरकार किमती नियंत्रित करण्यासाठी पीएसएफ बफर स्टॉकमधून तूर डाळ विकत आहे. याशिवाय चणा डाळ आणि मूग डाळ सातत्याने बाजारात येत आहे. मात्र असं असतानाही भाव आटोक्यात येत नाहीत.


हेही वाचा:


Apple iPhone 15 ची तारीख ठरली; ॲपलकडून 'या' दिवशी नवे गॅजेट्स बाजारात येणार