नवी दिल्ली भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेला मोठं यश मिळाले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थने (ISRO) मंगळवारी महत्त्वाची माहिती दिली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील दक्षिण ध्रुवावर सल्फर असल्याचा निर्वाळा प्रज्ञान रोव्हरने दिला आहे. त्याशिवाय, इतर धातू आणि ऑक्सिजनचे प्रमाण आढळले आहे. इस्रोकडून आता हायड्रोजनचा शोध सुरू आहे. 


इस्रोने म्हटले की, "इन-सिटू (इन सिटू) वैज्ञानिक प्रयोग सुरू आहेत... इन-सीटू मापनाद्वारे, रोव्हरवरील 'लेझर-इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप' (LIBS) या उपकरणाने प्रथमच दक्षिण ध्रुवावर सल्फर स्पष्टपणे शोधले आहे. 


Al, Ca, Fe, Cr, Ti, Mn, Si, आणि O चा शोध लागला असून आता हायड्रोजनचा शोध सुरू असल्याचे इस्रोने म्हटले. LIBS नावाचा हा पेलोड बेंगळुरू येथील ISRO च्या इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम्स (LEOS) प्रयोगशाळेत विकसित केला गेला आहे.


 







चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय आढळले?


इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, इस्रोच्या माहितीनुसार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ॲल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टिटॅनियम, मॅगनिस, सिलिकॉन आणि ऑक्सिजन असल्याची माहिती देण्यात आली आहे.  दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात धातू असल्याचे आढळून आले आहे. दक्षिण ध्रुवावर हायड्रोजनचा शोध रोव्हरकडून सुरू असल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. 


'प्रज्ञान'ने दक्षिण ध्रुवावरील मातीचे तापमान मोजले 


विक्रम लँडरमधून वेगळे झाल्यानंतर प्रज्ञान रोव्हरने आपल्या कामास सुरुवात केली आहे. प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरील दक्षिण ध्रुवावरील मातीचे परीक्षण सुरू केले. इस्रोने मातीच्या तापमानाचा आलेखही शेअर केला आहे. आलेखामध्ये तापमान उणे 10 अंश सेल्सिअस ते 50 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले.  


चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारता हा पहिलाच देश आहे. 


विक्रम लॅंडर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाचे नाव 'शिवशक्ती'


भारताचे मून लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले ते ठिकाण 'शिवशक्ती' म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. शनिवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बंगळुरु येथील इस्रोच्या मुख्यालयात आले. त्यानंतर शास्त्रज्ञांशी संवाद साधण्यासाठी ते इस्रो कॅम्पसमध्ये पोहोचले यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. 


इतर महत्त्वाची बातमी :