Overseas Tour Package : परदेशी टूरवर जाताय? विदेशी टूर पॅकेजवर 20 टक्के TCS लागू, अतिरिक्त शुल्क टाळण्याचे 3 प्रभावी मार्ग
Overseas Tour Package : सरकारकडून परदेशात क्रेडिट कार्डच्या खर्चावर 20 टक्के TCS लावण्यात आला आहे. हे अतिरिक्त शुल्क टाळण्याचे तीन प्रभावी मार्ग जाणून घ्या.
How to Avoid 20 Percent TCS : येत्या महिन्यापासून तुमच्या पुढील परदेशातील सुट्टीवर (Overseas Tour Package) अतिरिक्त शुल्क देण्यासाठी तयार रहावं लागणार आहे. सरकारने 1 जुलै 2023 पासून परदेशी टूर पॅकेजवर 20 टक्के टीसीएस (TCS) लागू होईल. सध्या तुम्ही परदेशी टूर पॅकेज बुक केल्यास तुम्हाला 5 टक्के टीसीएस भरावा लागतो. पुढच्या महिन्यापासून, तुम्हाला प्रवास करताना जास्त खर्च सहन करावा लागेल. तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तुम्ही TCS वर रिफंडचा दावा करू शकता, पण तुमच्या रिफंडची रक्कम पुढील आर्थिक वर्षात तुमच्या परताव्यासाठीच्या दाव्यावर प्रक्रिया होईपर्यंत लॉक केली जाईल.
परदेश टूर पॅकेजवर 20 टक्के TCS
परदेशी टूर पॅकेजवर 1 जुलै 2023 पासून 20 टक्के अतिरिक्त कर (TCS) लागू होईल. तुम्ही लवकरच आंतरराष्ट्रीय सहलीला जाण्याचा विचार करत असल्यास, तुम्हाला हा नवीन नियम समजून घेणं आवश्यक आहे. तुमच्या कष्टाने कमावलेले पैसे वाचण्यासाठी तुम्ही काही मार्गाचा अवलंब करु शकता. तुमच्या पुढील आंतरराष्ट्रीय सहलीदरम्यान 20 टक्के TCS टाळण्याचे 3 मार्ग कोणते ते जाणून घ्या.
1. आंतरराष्ट्रीय डेबिट किंवा क्रेडिट कार्डची 7 लाख रुपयांची मर्यादा वापरा
तुम्ही देशांतर्गत ट्रॅव्हल एजंट किंवा ऑनलाइन पोर्टलद्वारे तुमची परदेशी सहल बुक केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात TCS चा खर्च सहन करावा लागेल. पण, जर तुम्ही आंतरराष्ट्रीय वेबसाइट्सद्वारे ऑफर केलेले टूर पॅकेज बुक केलं आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केलं, तर पेमेंट 7 लाखांच्या मर्यादेत असल्यास कोणतेही TCS लागू होणार नाही. 1 जुलै 2023 पासून आर्थिक वर्षात 7 लाख रुपयांपर्यंतच्या आंतरराष्ट्रीय डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून वैयक्तिक पेमेंटवर TCS आकारला जाणार नाही, ही माहिती वित्त मंत्रालयाने याआधी दिली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय डेबिट किंवा क्रेडिट कार्डची 7 लाख रुपयांची मर्यादा वापरा. तुम्ही आंतरराष्ट्रीय टूर ऑपरेटरद्वारे टूर पॅकेज बुक करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला सूट मिळू शकते.
2. स्वतंत्र बुकिंग आणि पेमेंट केल्यास TCS वाचवू शकता
परदेशातील टूर पॅकेजवर 20 टक्के टीसीएस लागू करण्यात आला आहे. "कायद्यानुसार टूर पॅकेज काय आहे याची व्याख्या पूर्णपणे स्पष्ट नाही. पॅकेजवरील TCS शुल्क टाळण्यासाठी तुम्ही फ्लाइट, हॉटेल आणि प्रेक्षणीय स्थळांसाठी स्वतंत्रपणे बुकींग करू शकतात. तुम्ही एअर इंडिया किंवा विस्तारा किंवा इंडिगो वरून तुमचे फ्लाइट तिकीट थेट खरेदी केल्यास, तेथे TCS नसेल. त्याचप्रमाणे, तुम्ही तुमचे हॉटेल थेट संबंधित हॉटेलच्या वेबसाइटवरून बुक केल्यास आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास, जर रक्कम 7 लाख रुपयांच्या मर्यादेत असेल तर तुम्हाला TCS भरावा लागणार नाही. त्यासाठी तुम्हाला टूर पॅकेज घेण्याऐवजी विमान तिकिटे, हॉटेल्स आणि इतर खर्च स्वतंत्रपणे बुक करावं लागेल.
3. परदेशी चलन किंवा फॉरेक्स कार्ड खरेदी करा
20 टक्के टीसीएस टाळण्यासाठी 30 जून 2023 आधी टूर पॅकेज खरेदी करु शकता. बरेच लोक आंतरराष्ट्रीय सहलीवर असताना त्यांचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याऐवजी परदेशी चलन खरेदी करणे किंवा फॉरेक्स कार्ड वापरणे पसंत करतात. जास्त TCS भरणे टाळण्यासाठी तुम्ही 30 जून 2023 पर्यंत विदेशी चलन किंवा फॉरेक्स कार्ड खरेदी करू शकता. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) तुम्हाला तुमच्या प्रवासाच्या तारखेच्या 60 दिवस आधी परकीय चलन किंवा फॉरेक्स ट्रॅव्हल कार्ड खरेदी करण्याची परवानगी देते. जर तुम्ही परदेश वारीची योजना आखत असाल तर आता विदेशी चलने किंवा फॉरेक्स ट्रॅव्हल कार्ड खरेदी करू शकता आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत कधीही प्रवास करुन TCS वर 20 टक्के बचत करू शकता.