Sugar stocks: सरकारचा एकच निर्णय अन् आज 11 टक्क्यांनी वधारले 32 शेअर्स; गुंतवणूकदार मालामाल
सोमवारी बाजार उघडताच शुगर सेक्टरमधील 32 शेअर्समध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. हे शेअर्स सुमारे 11 टक्क्यांनी वाढले होते, त्यामागे सरकारचा निर्णय आहे.
Sugar Stocks: केंद्र सरकारच्या (Central Government) एका निर्णयानंतर शुगर सेक्टरचे स्टॉक (Sugar Sector Stocks) तेजीत असल्याचं पाहायला मिळालं. अनेक साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स 11 टक्क्यांनी वाढल्यानं गुंतवणूकदारांमध्येही मोठा आनंद पाहायला मिळाला. याचाच परिणाम म्हणून, सोमवारी साखर क्षेत्रातील 32 शेअर्स 11 टक्क्यांपर्यंत वाढल्याचं पाहायला मिळालं. खरंतर, 7 डिसेंबर रोजी, भारत सरकारनं 2023-24 पुरवठा वर्षासाठी (नोव्हेंबर-ऑक्टोबर) इथेनॉल तयार करण्यासाठी उसाच्या रसाच्या वापरावर बंदी घातली होती, ज्यामुळे 2025 मधील साखर कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. साखरेच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेतील पुरवठा पूर्ण करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला होता, मात्र आता सरकारनं हा आदेश मागे घेतला आहे.
साखरेच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारचा निर्णय
सध्या देशात साखरेच्या दरात (Sugar Price) मोठी वाढ झाली आहे. कारण ऊसाच्या उत्पादनात घट झाल्याचा परिणाम दरांवर होत आहे. दरम्यान, याबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर (Ethanol Production) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे मानले जात होते. मात्र, वाढता विरोध पाहता सरकारनं पुन्हा इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे.
सरकारनं निर्णय बदलला
केंद्र सरकारनं आता इथेनॉल (Ethanol) तयार करण्यासाठी उसाच्या रसाचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. सरकारनं 2023-24 पुरवठा वर्षात हिरवं इंधन तयार करण्यासाठी ज्यूससह बी-हेवी गुळाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. अशा परिस्थितीत चिनी कंपन्यांची कमाई वाढण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या या निर्णयानंतर साखर क्षेत्रात जोरदार वाढ झाली आहे.
'या' शेअर्समध्ये प्रचंड वाढ
धामपूर साखर कारखान्याचे (Dhampur Sugar Mills) शेअर्स 8.22 टक्क्यांनी वाढून 268.45 रुपयांवर व्यवहार करत होते. बजाज हिंदुस्तान शुगर लिमिटेड (Bajaj Hindustan Sugar Ltd) 9.22 टक्क्यांनी वाढून 91.38 रुपयांवर, बलरामपूर चिनी मिल्स 7.15 टक्क्यांनी वाढून 412.05 रुपयांवर, द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज 6.39 टक्क्यांनी वाढून 91.38 रुपयांवर, इंडियन सारकोस लि. 9.0 टक्क्यांनी वधारत होते. 10.65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे श्री रेणुका शुगर्स 6.86 टक्क्यांनी वाढून 49.99 रुपये, उगर शुगर वर्क्स लिमिटेड 7.98 टक्क्यांनी वाढून 86.84 रुपये, त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड 4.96 टक्क्यांनी वाढून 355.30 रुपये आणि मगध शुगर अँड एनर्जी लिमिटेड 6.26 टक्क्यांनी वाढून 49.75 रुपयांवर व्यवहार करत होते.
तज्ज्ञांचं म्हणणं काय?
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, साखर क्षेत्रावर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचा असा विश्वास होता की, हा निर्णय मागे न घेतल्यानं 2025 च्या आर्थिक वर्षातील साखर कंपन्यांच्या कमाईवर परिणाम होईल. दरम्यान, त्यांना आर्थिक वर्ष 2026 मध्ये सुधारणा अपेक्षित होती. साखर क्षेत्रासाठी दीर्घकालीन शक्यता असल्याचं सुचवताना तज्ज्ञांनी या बंदीला 'तात्पुरता धक्का' असं म्हटलं आहे.
(टीप : IPO मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)