Stock Market Crash : शेअर बाजारात त्सुनामी; सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला
Stock Market Crash : जागतिक घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. बाजार सुरू होताच सेन्सेक्स तब्बल 1300 अंकांनी कोसळला.
Stock Market Crash : रशिया-युक्रेन युद्धाची झळ शेअर बाजाराला बसू लागली आहे. आज, सोमवारी सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला. तर, निफ्टीतही मोठी पडझड झाली आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच बाजार एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोसळल्याने गुंतवणूकदार होरपळले आहेत. शेअर बाजार आज दिवसभर अस्थिर राहण्याचे संकेत आहेत.
SGX निफ्टीमध्ये 458 अंकांची घसरण झाली आहे. जागतिक शेअर बाजारातही रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम दिसत आहे. जागतिक शेअर बाजारात विक्रीचा मोठा दबाव दिसून येत आहे. निक्केईमध्ये घसरण झाली आहे. तर, हँगसँग 768 अंकांनी, तैवानचा निर्देशांक 3.15 टक्क्यांनी म्हणजे जवळपास 560 अंकांनी कोसळला आहे. तर, शांघाई शेअर बाजाराचा निर्देशांकही 1.45 टक्क्यांनी कोसळला आहे.
बँक निफ्टीतही मोठी घसरण दिसून आली आहे. सेन्सेक्समधील सर्व 30 स्टॉक्समध्ये घसरण झाली आहे. निफ्टीतील 50 पैकी 46 शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
वधारणारे शेअर्स
हिंडाल्को 2.67 टक्क्यांनी वधारला असून 599 रुपयांवर ट्रे़ड करत आहे. तर, कोल इंडिया 1.93 टक्क्यांनी वधारला असून 184 रुपयांवर ट्रेड करत आहे. ओएनजीसीच्या शेअरमध्ये 1.72 टक्क्यांनी वधारला आहे. टाटा स्टीलच्या शेअर दरात 1.61 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एनएसईमध्ये तांत्रिक बिघाड?
सर्व ब्रोकर्ससाठी NSE कॅश दर अपडेट होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे गुंतवणूकदार मोठे नुकसान झाले आहे. एनएससीकडून मात्र बिघाडाबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
कच्च्या तेलाचे दर 139 डॉलर प्रति बॅरल पार
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं (Russia Ukraine War) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी (Crude Oil Price) उच्चांक गाठला आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी 2008 नंतर पहिल्यांदाच सर्वोच्च पातळी गाठली आहे. ब्रेंट क्रूडचे दर 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. 2008 मध्ये कच्च्या तेलाचे दर 147 डॉलर प्रति बॅरल इतका विक्रमी होता.