नाशिक : गेल्या काही दिवसांपासून प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) चांगलाच सक्रीय झाला आहे. या विभागाने नुकतेच नांदेडमध्ये मोठी छापेमारी (Nanded IT Raid) केली होती. या छापेमारीत कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर आता नाशिकमध्येही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. येथे एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी करून प्राप्तिकर विभागाने (IT Raid) तब्बल 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या या कारवाईमुळे सध्या नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 


कारवाईला लागले तब्बल 30 तास 


ही कारवाई करताना नाशिक, नागपूर आणि जळगावचे अधिकारी एकत्र आले होते. त्यांनी एकूण 26 कोटींची रोकड जप्त केली आहे. जप्त केलेली ही रक्कम मोजण्यासाठी या अधिकाऱ्यांना तब्बल 14 तास लागले आहेत. जप्त केलेली ही रक्कम मोजण्यासाठी प्राप्तिकर विभागाला एकूण सात कार बोलवाव्या लागल्या. सलग 30 तास ही कारवाई चालू होती. नाशिक, नागपूर, जळगावच्या पथकाने ही कारवाई केली. 50 ते 55 अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापासत्र सुरू केले होते. त्याचवेळी त्यांच्या राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यातदेखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली होती. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले. मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करण्यात आली.


नाशिक शहरात खळबळ


नाशिक शहरात एका सराफा व्यापाऱ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता सापडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांत सध्या तणावाचे वातावरण आहे. आगामी काळात प्राप्तिकर विभाग कारवाईचा बडगा कोणावर उचलणार, असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जात आहे. 


नांदेडच्या कारवाईत 60 अधिकारी


दरम्यान, प्राप्तिकर विभागाने 13 मे रोजी नांदेड शहरातही अशाच प्रकारची कारवाई केली होती. या कारवाईमुळेही नांदेडमध्ये व्यापाऱ्यांमध्ये तणावाची स्थिती होती. या कारवाईत आयटी विभागाने तब्बल 170 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली होती. ही कारवाई करण्यासाठी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूरनांदेडपरभणी या शहरांतील प्राप्तिकर विभागाचे अधिकारी बोलवण्यात आले होते. या वेगवेगळ्या शहरांतून 25 वाहनांत साधारण 60 पेक्षा अधिक अधिकारी नांदेडमध्ये गेले होते. 


नांदेडच्या कारवाईत नेमकं काय-काय जप्त केलं?


प्राप्तिकर विभागाने नांदेडच्या या कारवईत एकूण 170 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली होती. यासह 14 कोटी रोख स्वरुपात तसेच 8 किलोचे दागिनेही या कारवाईत जप्त करण्यात आले होते. जप्त केलेली रोकड मोजण्यासाठी प्राप्तिकर विभागाला तब्बल 14 तास लागले होते. साधारण 72 तासांपेक्षा अधिक काळ ही कारावाई चालू होती. 


हेही वाचा :


26 गाड्यांचा ताफा, 60 अधिकारी, प्राप्तिकर विभागाची नांदेडमध्ये छापेमारी, 170 कोटींची मालमत्ता जप्त!


जिकडे तिकडे फक्त नोटाच नोटा; झारखंडमधील मंत्र्यांच्या स्वीय सचिवाच्या नोकराच्या घरी नोटा, निवडणुकीच्या धामधुमीत ईडीची मोठी छापेमारी