मुंबई : क्रेडिट कार्डचे (Credit Card) अनेक फायदे आहेत. खिशात एक रुपयाही नसताना तुम्ही याच क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुमच्या क्रेडिट लिमिटनुसार खरेदी करू शकता. तुम्ही खर्च केलेले पैसे नंतर तुम्हाला ईएमआयच्या मदतीने परत करता येतात. यासाठी बँका काही व्याज आकारतात. दरम्यान, क्रेडिट कार्ड वापरण्याचे जसे अनेक फायदे आहेत, अगदी तसेच काही तोटेदेखील आहेत. क्रेडिट कार्ड वापरताना काही चुका केल्यास तुम्हाला त्याचा आर्थिक दंड भरावा लागू शकतो. म्हणजेच क्रेडिट कार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास तुमच्या खिशाला कात्री लागू शकते. याच पार्श्वभूमीवर तुम्ही पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेत असाल तर काय काळजी घ्यायला हवी, हे जाणून घेऊ या. 


नेमके कोणते क्रेडिट कार्ड घ्यावे याचा अभ्यास करा


क्रेडिट कार्ड (Credit Card) च्या वापरचे फायद्यांप्रमाणेच काही तोटेदेखील आहेत. सध्या वेगवेगळ्या बँका तुम्हाला आकर्षक ऑफर्स देऊन क्रेडिट कार्ड घ्यायला लावतात. या वेगवेगळ्या ऑफर्सचा ग्राहकांनाही फायदा होतो. मात्र याच ऑफर्समुळे नेमके कोणते क्रेडिट कार्ड घ्यावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याआधी खालील गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.  


कार्ड नेमके का घ्यायचे आहे, हे तपासा


क्रेडिट कार्ड घेताना तुमचा मासिक खर्च किती आहे, हे अगोदर समजून घ्या. तुमच्या मासिक खर्चानुसारच तुम्ही क्रेडिट कार्ड घ्यायला हवे. तुम्ही एखादे क्रेडिट कार्ड घेतले असेल, तर ते का घेतले? या प्रश्नाचे तुमच्याकडे उत्तर असणे गरजेचे आहे. म्हणजेच तुम्हाला त्या क्रेडिट कार्डची सर्व माहिती असणे गरजेचे आहे.


क्रेडिट कार्ड घेण्याआधी मला ते का हवे आहे? असा प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे. मला खरंच क्रेडिट कार्डची गरज आहे का? हेही तुम्ही स्वत:ला विचारले पाहिजे. मोठी लिमिट मिळवून मला हे क्रेडिट कार्ड खरेदीसाठी वापरायचे आहे का? मला क्रेडिट कार्डच्या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे का? या सर्व सर्व प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.  


क्रेडिट कार्डकडून दिल्या जाणाऱ्या सवलती जाणून घ्या


प्रवासावर, इंधनावर, हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च, हॉटेलमध्ये जेवणाचा खर्च यावर अनेक क्रेडिट कार्ड ऑफर देतात. त्यामुळे प्रत्येक क्रेडिट कार्डचे बेनिफीट काय आहे, हे जाणून घेतले पाहिजे. प्रत्येक क्रेडिट कार्डसाठी वेगळ्या अटी असतात. त्यामुळे त्या अटी काय आहेत? हे अगोदर जाणून घेतले पाहिजे. 


गरजा पूर्ण होतील का? हे तपासा


तुमच्याकडे अनेक क्रेडिट कार्ड्सचा पर्याय असतो. पण तुमच्यासाठी कोणते कार्ड योग्य राहील, याची तुम्हाला तुलना करावी लागेल. यामुळे तुमची द्विधा मनस्थिती कमी होईल. क्रेडिट कार्डची वार्षिक फी किती आहे? ती मी देऊ शकतो का? आदी प्रश्नदेखील स्वत:ला विचारले पाहिजेत. क्रेडिट कार्डच्या मदतीने तुमच्या गरजा पूर्ण होतात का? याचाही विचार करणे गरजेचे आहे.


या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या सोईचे आणि तुमच्या सर्व गरजा पूर्ण करणारेच क्रेडिट कार्ड घ्यावे. ज्या क्रेडिट कार्ड्सवर वेगवेगळ्या ऑफर्स आहेत, तसेच अन्य सुविधा मिळतात, अशाच क्रेडिट कार्डसाठी अर्ज करा.


बँकेत जाऊन, बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन किंवा थर्ड पार्टीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता. वरील सर्व प्रश्नांची उत्तर मिळवूनच, तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करायला हवे. 


हेही वाचा :


'हे' नऊ पेनी स्टॉक करणार कमाल, तुमचा खिसा पैशांनी भरणार; मालामाल होण्याची संधी!


माही भाई आता दिसणार नव्या भूमिकेत, 'या' कंपनीशी केला महत्त्वाचा करार!


जून महिन्यात बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या! जाणून घ्या कोणत्या दिवशी बँका राहणार बंद