Share Market: भारतीय शेअर बाजारात गेल्या दोन सत्रातील झालेल्या घसरणीमुळे दहा लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं दिसून आलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर रशिया आणि युक्रेनमध्ये वाढलेला तणाव, एबीजी शिपयार्ड कंपनी घोटाळा यामुळे शेअर बाजारात विक्रीचा झपाटा सुरू झाला.
आंतरराष्ट्रीय पातळीवर रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर तणाव सुरू आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली असून ती 94 डॉलर प्रति बॅरेल इतकी झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर झाला आहे. ABG शिपयार्डने तब्बल 28 बँकांना 22,842 कोटी रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. हा इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही घटनांचा परिणाम हा भारतीय शेअर बाजारावर झाला झाला आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या तणावाचा परिणाम हा शॉर्ट टर्मसाठी असेल असं मत अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. अमेरिकेतील विक्रमी महागाई, युक्रेन तणाव, अनिल अंबानी यांच्यासह इतर चार जणांवर सेबीने शेअर बाजारात व्यवहार करण्यास केलेल्या मनाईचाही परिणाम बाजारातील व्यवहारावर झाला आहे.
एप्रिल 2021 नंतर सर्वात मोठी घसरण
आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1747 अंकांनी घसरला आणि तो 56,405.84 वर स्थिरावला. तसेच निफ्टीही 532 अंकांनी घसरून 16,842.80 वर स्थिरावला. सेन्सेक्समध्ये तब्बल 3 टक्क्यांची तर निफ्टीमध्ये 4 टक्क्यांची घसरण झाल्याचं पहायला मिळालं आहे. एप्रिल 2021 नंतर एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे.
सार्वजनिक बँका, ऑटो, बॅंक, ऑईल ॲंड गॅस, एफएमसीजी, फार्मा, मेटल, रिॲलिटी, कॅपिटल गुड्स या सर्वच क्षेत्रात 2 ते 6 टक्क्यांकी घसरण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Share Market Updates : शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला
- SBI on ABG Shipyard issue : एबीजी शिपयार्डविरुद्ध तक्रारी दाखल करण्यास विलंब नाही, एसबीआयचं स्पष्टीकरण
- Share Market : शेअर बाजारावर ABG शिपयार्ड घोटाळ्याचे सावट