SBI on ABG Shipyard issue : एबीजी शिपयार्ड कंपनीच्या घोटाळ्याप्रकरणी एसबीआयकडून रविवारी परिपत्रक जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे. एबीजी शिपयार्ड विरुद्ध तक्रारी दाखल करण्यास विलंब झालेला नाही, असं स्पष्टीकरण एसबीआयनं दिलं आहे.  एबीजी शिपयार्डविरोधात तक्रारी करण्यास विलंब लावल्याने अनेकांकडून एसबीआयवर टीका झाली होती.  आयसीआयसीआय बॅंकेच्या नेतृत्वाखालील 2 डझनहून अधिक बॅंकांच्या संघ व्यवस्थेअंतर्गत वित्तपुरवठा केला असल्याचं एसबीआयचं म्हणणं आहे. 






एसबीआयनं जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, कंपनीच्या खराब कामगिरीमुळे नोव्हेंबर 2013 सालीच कंपनीचे खाते एनपीए झाले.  कंपनीचे कामकाज पुन्हा सुरु करण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत मात्र यश आले नाही, असं एसबीआयकडून काल संध्याकाळी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.


शेअर बाजारातील  व्यवहारावर ABG शिपयार्ड घोटाळ्याचे सावट


मागील काही दिवसांपासून सातत्याने अस्थिर असलेल्या शेअर बाजारातील सोमवारच्या व्यवहारावर ABG शिपयार्ड घोटाळ्याचे सावट आहे. ABG शिपयार्डने तब्बल 28 बँकांना 22,842 कोटी रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्याचा परिणाम शेअर बाजारावर होणार असल्याची शक्यता आहे. त्यातच अमेरिकेतील महागाई, रशिया-युक्रेन तणाव आदींचा परिणाम होण्याची भीती आहे. 


 तब्बल 28 बँकांच्या 22,842 कोटी रुपयांचा घोटाळा


ABG शिपयार्डने तब्बल 28 बँकांच्या 22,842 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच CBI ने ABG शिपयार्ड आणि त्याचे तत्कालीन अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अन्य 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ABG शिपयार्ड ही कंपनी जहाजाची निर्मिती आणि दुरुस्ती करण्याचे काम करते. या कंपनीचे शिपयार्ड गुजरातमधील दहेज आणि सूरत येथे आहेत. ABG शिपयार्ड कंपनीच्या एकूण आठ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, हा घोटाळा एप्रिल 2012 ते जुलै 2017 यादरम्यान झाला आहे. सीबीआयद्वारे दाखल करण्यात आलेला हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. शिपयार्ड कंपनीने एसबीआय बँकेचे 7089 कोटी, आयडीबीआय बँकेचे 3634 कोटी रुपये, बँक ऑफ बडोद्याचे 1614 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेचे 1244 कोटी रुपये आणि  1228 कोटी रुपये इंडियन ओवरसीज बँकेकडून घेतले आहेत. एलआयसीचे देखील 134 कोटी रुपये या कंपनीत अडकले आहेत.