Share Market and ABG Scam : मागील काही दिवसांपासून सातत्याने अस्थिर असलेल्या शेअर बाजारातील सोमवारच्या व्यवहारावर ABG शिपयार्ड घोटाळ्याचे सावट आहे. ABG शिपयार्डने तब्बल 28 बँकांना 22,842 कोटी रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्याचा परिणाम शेअर बाजारावर होणार असल्याची शक्यता आहे. त्यातच अमेरिकेतील महागाई, रशिया-युक्रेन तणाव आदींचा परिणाम होण्याची भीती आहे.
ABG शिपयार्डने तब्बल 28 बँकांच्या 22,842 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच CBI ने ABG शिपयार्ड आणि त्याचे तत्कालीन अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अन्य 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ABG शिपयार्ड ही कंपनी जहाजाची निर्मिती आणि दुरुस्ती करण्याचे काम करते. या कंपनीचे शिपयार्ड गुजरातमधील दहेज आणि सूरत येथे आहेत. ABG शिपयार्ड कंपनीच्या एकूण आठ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, हा घोटाळा एप्रिल 2012 ते जुलै 2017 यादरम्यान झाला आहे. सीबीआयद्वारे दाखल करण्यात आलेला हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे.
शिपयार्ड कंपनीने एसबीआय बँकेचे 7089 कोटी, आयडीबीआय बँकेचे 3634 कोटी रुपये, बँक ऑफ बडोद्याचे 1614 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेचे 1244 कोटी रुपये आणि 1228 कोटी रुपये इंडियन ओवरसीज बँकेकडून घेतले आहेत. एलआयसीचे देखील 134 कोटी रुपये या कंपनीत अडकले आहेत.
जागतिक बाजारात घसरण, देशातंर्गत शेअर बाजारावर परिणाम होणार?
शेअर बाजारातील इतर घटकांचा परिणाम होत असतो. या शिपिंग घोटाळ्याचा परिणाम बँक निफ्टीवर होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय जागतिक शेअर बाजारामध्येही घसरण दिसून आली आहे. SGX हा 1.5 टक्क्यांनी घसरला आहे.
अमेरिकेतील महागाई, युक्रेन तणावासह अनिल अंबानी यांच्यासह इतर चार जणांवर सेबीने शेअर बाजारात व्यवहार करण्यास केलेल्या मनाईचाही परिणाम होऊ शकतो.
(Disclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागार, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )