Shambhuraj Desai : भाजपचा शतप्रतिशतचा नारा, सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हातात कमळ, आता शंभूराज देसाई म्हणाले प्रथम दोन नेत्यांसोबत बोलणार
Shambhuraj Desai : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांच्या भाजप प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई : महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यानंतर विरोधी पक्षातून महायुतीमधील घटकपक्षांमध्ये इनकमिंग वाढलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांचे कट्टर विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यात वैभव पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचे ते प्रतिस्पर्धी आहेत. सत्यजितसिंह पाटणकर यांनी अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली होती. सत्यजीत पाटणकर यांच्या भाजप प्रवेशवर शंभूराज देसाई हे नाराज असल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणार असल्याचं देसाई यांनी म्हटलं.
शंभूराज देसाई काय म्हणाले?
पाटणचे आमदार आणि पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी आम्ही याच्यावर बोलणं योग्य नाही, आम्ही आमचं काम करतोय. गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. या दरम्यान महायुती म्हणून सगळीकडे काम केलं आहे. मंत्री म्हणून ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्या पूर्ण केल्या आहेत.
काल देखील आपल्या माध्यमांकडून कळालं. आमच्या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातील नेत्यांचा प्रवेश झाला आहे. मी याच्याबाबत जे काय बोलायचं आहे ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणार आहे. भेटीची वेळ मागितलेली आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले.
1980 मध्ये बाळासाहेब देसाई यांच्या आयुष्यातील शेवटची विधानसभा निवडणूक होती. त्यावेळी विक्रमसिंह पाटणकर यांनी बाळासाहेब देसाई यांच्या विरोधात बंडखोरी केली होती. तीन पिढ्यापासून हे राजकीय मतभेद आहेत. राजकीय मतभेद असणाऱ्या लोकांचा महायुतीतील मोठ्या पक्षात प्रवेश झाला आहे. शिस्तबद्ध शिवसैनिक असल्यानं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले.
दोन्ही नेत्यांची भेट मागितली आहे. माझं मत दोन्ही नेत्यांसमोर मांडणार आहे. त्यानंतर मला आवश्यकता वाटली तर माध्यमांसोबत बोलणार असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले.
पाटण विधानसभा निवडणूक निकाल
पाटण विधानसभा मतदारसंघात देसाई आणि पाटणकर हे पारंपरिक विरोधक आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पाटणची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आली होती. त्यामुळं सत्यजितसिंह पाटणकर अपक्ष रिंगणात होते. मात्र, प्रमुख लढत शंभूराज देसाई आणि सत्यजितसिंह पाटणकर यांच्यामध्ये झाली होती. शंभूराज देसाई यांनी 125759 मतं मिळवली होती तर सत्यजितसिंह पाटणकर यांना 90935 मतं मिळाली. हर्षद कदम यांना 9626 मतं मिळाली. शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांचा 34824 मतांनी पराभव केला.























