SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, BSBD खात्यातून पैसे काढण्याचा नियम बदलला, मोफत व्यवहारांनंतर 15 रुपये शुल्क घेणार, 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियानं BSBD खात्यासंदर्भात मोठा बदल केला आहे. एका महिन्यात खात्यातून विनाशुल्क पैसे काढण्याची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

SBI BSBD Account Rule मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियानं बेसिक सेविंग्ज बँक डिपॉझिट खात्यांमधून पैसे काढण्यासंदर्भातील नियमात बदल केले आहेत. बँकेनं या खात्यांमधून विनाशुल्क पैसे काढण्याची मर्यादा निश्चित केली आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. नव्या नियमानुसार दरमहा बीएसबीडी खात्यातून चार वेळा विना शुल्क पैसे काढता येतील. त्यानंतर प्रत्येक वेळी पैसे काढताना प्रति व्यवहार 15 रुपये आणि जीएसटी शुल्क द्यावं लागेल.
BSBD खाते म्हणजे काय?
बेसिक सेविंग्ज बँक डिपॉझिट अकाऊंट हे बेसिक बँकिंग खातं आहे. या खात्यातून बचत खात्यासाठी दिल्या जाणाऱ्या सेवा दिल्या जातात. खातेधारकांना BSBD खात्यात किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स ठेवावा लागत नाही. या खात्यांचा उद्देश पैसे जमा करणे आणि काढणे अशा सुविधा उपलब्ध करुन देणे आहे. सेवा आणि व्यवहारांची मर्यादा याबाबत BSBD खातं आणि नियमित सेविंग्ज खातं यामध्ये फरक असतो.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार BSBD खातेधारक एका महिन्यात चारवेळा कोणत्याही शुल्काशिवाय पैसे काढू शकतात. चार व्यवहारांच्या मर्यादेनंतर पैसे काढण्याच्या प्रत्येक व्यवहारासाठी 15 रुपयांचं शुल्क आणि जीएसटी द्यावा लागेल. हा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. जर, एखादा खातेदार खात्यातून बँकेच्या शाखेतून सहा वेळा पैसे काढत असेल तर पहिल्या चार व्यवहारांसाठी शुल्क लागणार नाही तर इतर दोन व्यवहारांसाठी शुल्क आकारलं जाईल. BSBD खात्यातून केली जाणारे डिजीटल व्यवहार मोफत सुरु राहतील, असं देखील सांगण्यात आलं आहे.
बेसिक सेविंग्ज बँक डिपॉझिट अकाऊंट या खात्यातवर बेसिक रुपे एटीएम कम डेबिट कार्ड मिळतं. या कार्डचे मेंटनन्स शुल्क, एनईएफटी, आरटीजीएस या सारखे इलेक्ट्रॉनिक व्यवहार मोफत उपलब्ध असतात. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून बंद असलेलं खातं पुन्हा सुरु करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही.
— State Bank of India (@TheOfficialSBI) August 20, 2026
महत्त्वाच्या बातम्या






















