RBI Repo Rate: रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्क्यांवर कायम, गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती
RBI Repo Rate: आज 10 वाजता रिझर्व बॅंकेचं पतधोरण जाहीर करण्यात आलं. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या.
RBI Repo Rate: कोरोना काळात खचलेल्या अर्थव्यवस्थेला आता हळूहळू उभारी मिळत असल्याची चिन्हं आहेत. आज 10 वाजता रिझर्व बॅंकेचं पतधोरण जाहीर करण्यात आलं. यावेळी रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. यात रिव्हर्स रेपो दर 3.35% वर कायम असल्याचं त्यांनी सांगितलं.
शक्तिकांत दास म्हणाले की, मार्जिनल स्टँडिंग सुविधा दर आणि बँक दर 4.25% वर कायम आहेत. रिव्हर्स रेपो दरही 3.35% वर कायम आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सुधारणेला गती मिळत आहे. मुद्राधोरण समितीच्या गेल्या बैठकीच्या वेळेच्या तुलनेत सध्या भारतीय अर्थव्यवस्था पुष्कळच सावरली आहे, असं दास म्हणाले.
दास म्हणाले की, वाढीला बळकटी, चलन फुगवट्या संदर्भातला मार्ग अपेक्षेपेक्षा अधिक अनुकूल आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक मूलभूत तत्त्वांच्या लवचिकतेमुळे सामान्य परिस्थतीकडे वाटचाल करण्याची आम्हाला आशा आहे, असं ते म्हणाले. एकूण मागणीत वाढ होत आहे तथापि, थोडी मंदगती कायम आहे. उत्पादन अद्यापि कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत कमीच आहे, असंही ते म्हणाले.
सावरण्याचा दर धोरणात्मक पाठबळावर अवलंबून असून तो असमान असलेला दिसतो. प्रत्यक्ष संपर्क येणारी क्षेत्रे अद्यापि पिछाडीवर आहेत, असं दास यांनी सांगितलं. शक्तिकांत दास यांनी सांगितलं की, इंधनावरील अप्रत्यक्ष कर आकारणी विचारपूर्वक सांभाळली जात आहे. खर्च वाढल्याने येणारी महागाई सौम्य करणे हा त्याचा उद्देश आहे. तसेच अर्थव्यवस्था जपून पावले टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. #COVID19 च्या दुसऱ्या लाटेचा प्रतिकूल परिणाम होऊनही जीडीपीचे जवळजवळ सर्व घटक पहिल्या तिमाहीत Q1 मध्ये दरवर्षी वाढले, हे अर्थव्यवस्थेची लवचिकता दर्शवते, असंही ते म्हणाले.
दास यांनी सांगितलं की, कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे आणि ग्राहकांचा आत्मविश्वास वाढतो आहे, हे प्रयत्न खाजगी खपाला सहाय्यभूत ठरत आहेत, प्रलंबित मागणी आणि सणासुदीमुळे शहरी मागणी दुसऱ्या तिमाहीत आणखी वाढेल. पहिल्या अग्रिम अंदाजानुसार, 2021-22 मध्ये खरिपाचे उत्पादन विक्रमी झाल्याने व कृषीक्षेत्रात लवचिक सुधारणा झाल्याने ग्रामीण भागात मागणी वाढण्याची अपेक्षा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
सरकारच्या भांडवली खर्चात वाढ झाल्यास व वित्तीय स्थिती अनुकूल राहिल्यास, गुंतवणूक सुधारू शकेल. गुंतवणुकीच्या गतीत वाढ होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत, असं दास म्हणाले.