Pulses and Oilseeds Production: भारत अनेक पिकांमध्ये आघाडीवर असला तरी कडधान्ये (Pulses) आणि तेलबियांचे (Oilseeds) भारतात खूप कमी उत्पादन होते. भारतात कडधान्ये आणि तेलबिया पिकांकडे फार पूर्वीपासून दुर्लक्ष केलं जात असल्याचे तज्ज्ञांनी म्हटलंय. धोरणकर्त्यांनी या पिकांचे उत्पादन वाढवण्याऐवजी आयातीचा मार्ग स्वीकारला. याचा परिणाम असा झाला की आज आपण या डाळी आणि खाद्यतेलावर मिळून 1 लाख 58 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करत आहोत. 


आपण तांदूळ आणि गहू निर्यात करुन जेवढे कमावतो त्यापेक्षा जास्त खर्च आपण कडधान्ये आणि तेलबियांची आयात करण्यावर करतो. जो पैसा भारतीय शेतकऱ्यांना द्यायला हवा तो इंडोनेशिया, मलेशिया, रशिया, युक्रेन, अर्जेंटिना, म्यानमार आणि मोझांबिक या देशांतील शेतकऱ्यांच्या खिशात जात आहे. केवळ धोरण योग्य नसल्यामुळे हा पैसा परदेशात जात असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. पण आता या दोन पिकांचे आयात अवलंबित्व संपवून त्यात स्वावलंबी व्हायचे सरकारने ठरवले आहे. गेल्या काही वर्षांपासून यावर काम सुरू असून त्याचा परिणामही उत्पादन वाढीवर दिसून येत आहे.


2022-23 मध्ये तेलबिया पिकांचं उत्पादन 413.55 लाख मेट्रिक टन


केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 2018-19 मध्ये तेलबिया पिकांचे उत्पादन हे 315.22 लाख मेट्रिक टन होते. जे 2022-23 मध्ये 413.55 लाख मेट्रिक टन इतके वाढले आहे. म्हणजे साधारणपणे, पाच वर्षांत आम्ही उत्पादन 98 लाख मेट्रिक टनांनी वाढवले ​​आहे. त्यात आता आणखी वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, जेव्हा शेतकऱ्यांना मोहरी, सोयाबीन या पिकांना चांगला भाव मिळेल तेव्हा हा वेग वाढेल. 


कडधान्य पिकांचे उत्पादन किती?


2018-19 मध्ये भारतानं केवळ 220.75 लाख मेट्रिक टन  कडधान्य पिकांचं उत्पादन केले. जे 2022-23 मध्ये वाढून 260.59 लाख टन झाले. याचा अर्थ गेल्या पाच वर्षांत सुमारे 40 लाख टनांची वाढ झाली आहे. भारत हा डाळींचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. जगातील सुमारे 25 टक्के डाळींचे उत्पादन येथे होते. पण खप जगाच्या 28 टक्के आहे. त्यामुळं आम्ही अजूनही आयातदार आहोत. डिसेंबर 2027 पर्यंत भारताला डाळींच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्याचे लक्ष्य सरकारनं ठेवलं आहे. यासाठी नाफेडला नोडल एजन्सी बनवण्यात आली आहे. जी कडधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करेल आणि 100 टक्के डाळींची खरेदी करेल.


तेलबियांचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न 


तेलबियांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवून खाद्यतेलाची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकार सन 2018-19 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-तेलबिया चालवत आहे. तेलबिया पिकांमध्ये भुईमूग, सोयाबीन, रेपसीड आणि मोहरी, सूर्यफूल, करडई, तीळ, नायगर, जवस आणि एरंडेल यांचा समावेश होतो. ऑइल पाम क्षेत्राचा विस्तार करून खाद्यतेलाची उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने ऑगस्ट 2021 मध्ये राष्ट्रीय खाद्यतेल मिशन ऑइल पाम सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत 2025-26 पर्यंत ईशान्येकडील राज्यांमध्ये 3.28 लाख हेक्टर आणि उर्वरित भारतात 3.22 लाख हेक्टरवर ऑइल पामची लागवड केली जाईल. हे अभियान देशातील 15 राज्यांमध्ये लागू आहे.