पुणे: जुन्नर मतदारसंघाच्या दौऱ्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar Junnar Visit) ताफ्याला मराठा संघटनांनी काळे झेंडे दाखवल्याची घटना घडली. आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरुन मराठा समाजाच्या आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवार हे पुण्यातील जुन्नर विधानसभेचा दौरा करत असून त्यावेळी ही घटना घडली.
अजित पवारांनी मराठा समाजाला उद्देशून केलेल्या वक्तव्याचा निषेधार्ह अहमदनगर-कल्याण महामार्गावरील आळे फाटा परिसरात मराठा संघटनांकडून हे झेंडे दाखवण्यात आले.
मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी अजित पवारांनी हा दौरा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र मराठा समाजाच्या या मागणीला झुगारून अजित पवार दौऱ्यावर आले. त्यामुळं मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांनी अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. मराठा आरक्षण लवकरात लवकर मिळावं यासाठी घोषणाबाही केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
अजित पवार जुन्नरच्या दौऱ्यावर
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच जुन्नर विधानसभेचा दौरा करत आहेत. आजवर तटस्थ राहिलेले राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनकेंनी हा दौरा आखला आहे. यानिमित्ताने मतदारसंघात झळकलेल्या फ्लेक्सवर शरद पवारांना स्थान नाही. शरद पवारांनी जुन्नरमध्ये शेतकरी मेळावा घेऊन दोन आठवडे ही उलटले नाहीत, तोवर अतुल बेनके यांनी अजित पवारांच्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन केलं आहे. यावरून बेनके आता अजित दादांच्या गटात सामील झाल्याचे संकेत मिळत आहेत. अजित पवारांसोबत महायुतीच्या तिकिटावर शिरूर लोकसभा लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असणारे शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळरावही उपस्थित आहेत.
अतुल बेनके अजित पवार गटात
आतापर्यंत अतुल बेनके हे तटस्थ होते. त्यांनी नेमकी त्यांची भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी अतुल बेनके यांना जुन्नरमध्ये पर्याय उपलब्ध करुन दिला. शरद पवारांनी ऑफर दिली तर जुन्नर विधानसभा मी लढवणार, असं काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकर यांनी शरद पवार हे जुन्नर दौऱ्यावर असताना म्हटलं होतं. आपली भूमिका जाहीर न केलेल्या अतुल बेनके यांना शरद पवारांनी राजकीदृष्ट्या घेरायला सुरूवात केल्याची चर्चा रंगली होती. हे सगळं घडल्यानंतर लगेच अतुल बेनके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता थेट बेनके यांनी अजित पवार गटात सामील होणार असल्याचं जाहीर केलं आहे.
जुन्नर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. या ठिकाणी आमदार अतुल बेनके हे निवडून आले आहेत. आपण कुणाच्याही गटात नाही, आपली निष्ठा फक्त पवार कुटुंबीयांसोबत आहे असं जरी अतुल बेनके म्हणत होते तरी त्यांची अजित पवारांशी जवळीकता सर्वश्रूत होतं. त्यामुळे ते कधीही अजित पवार गटात जातील याची शक्यता नाकारता येत नव्हती अखेर त्यांनी अजित पवार गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
ही बातमी वाचा: