मुंबई : शेअर बाजारात (Share Market) अनेक चढऊतार होत असले तरी या मंचावर अशा काही कंपन्या आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर रिटर्न्स दिले आहेत. यामध्ये काही सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच सरकारी कंपन्यांचाही समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याे तीन कंपन्या आहेत, ज्यांनी फक्त दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल एक हजार टक्क्यांनी छप्परफाड रिटर्न्स दिले आहेत.

  


या शेअर्सने केलं मालामाल 


गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांत कोचीन शिपयार्ड, माझगांव डॉक शिपबिल्डर्स आणि रेल विकास निगम या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यात एखाद्या व्यक्तीने दोन वर्षांपूर्वी एक लाख रुपये गुंतवले असतील तर त्यांना या एका लाखाचे कमीत कमी 15 लाख रुपये मिळालेले आहेत. कोचीन शिपयार्ड या कंपनीचा विचार करायचा झाल्यास 2 वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना 1200 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. हा शेअर गेल्या शुक्रवारी एनएसईवर 2139 रुपये होता. दोन वर्षांपूर्वीचा विचार करायचा झाल्यास 24 जून 2022 रोजी हा शेअर 155 रुपयांवर होता.  


रेल विकास निगमने दिले 1200 टक्क्यांनी रिटर्न्स


शेअर बाजारात गुंतवणूकदारांना बम्पर रिटर्न्स देणाऱ्या कंपनीत रेल विकास निगम या कंपनीचाही समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी 24 जून 2022 रोजी या शेअरचे मूल्य फक्त 30 रुपये होते. गेल्या शुक्रवारी म्हणजेच 21 जून रोजी हा शेअर 409 रुपयांवर होता. म्हणजेच गेल्या दोन वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1200 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. सध्या हा शेअर स्टॉक मार्केटमध्ये चांगली कामगिरी करतोय. दोन वर्षांपूर्वी या कंपनीत एखाद्या गुंतवणूकदाराने एक लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याच पैशांचे मूल्य 13 लाख रुपये झाले आहे. 


माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीने दिले 1400 टक्क्यांनी रिटर्न्स


माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीनेही आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न्स दिले आहेत. दोन वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1400 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. 24 जून 2022 मध्ये हा शेअर 245 रुपयांवर होता. आता हाच शेअर 3896 रुपयांवर पोहोचला आहे. दोन वर्षांपूर्वी एका लाखांची गुंतवणूक केलेल्यांना या कंपनीने आज 15 लाख रुपये दिले आहेत.


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.) 


हेही वाचा :


आयटीआर भरताना 'या' साध्या-साध्या चुका पडू शकतात महागात; होऊ शकते मोठी अडचण!


देशात सुपर रिच टॅक्स लागू करा, गरिबी दूर होणार, तीन चतुर्थांश भारतीयांचे मत!


टाटा समुहाच्या 'या' कंपनीने जाहीर केला मोठा लाभांश, गुंतवणूकदार होणार मालामाल!