Latur NEET Exam Paper Leak Case : लातूर : लातूरमधील (Latur News) नीट पेपर फुटी प्रकरणातील 4 आरोपींची नावं समोर आली आहेत. चार आरोपींमध्ये आरोपी संजय जाधव, जरील खान, उमरखान पठाण यांची नाव समोर आली आहेत. तसेच, या शिक्षकांकडे 12 नीटच्या (NEET Exam) विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड सापडले आहेत. संजय जाधव आणि उमरखान पठाण यांच्या मोबाईलमध्ये बारा विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड सापडले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या अॅडमिट कार्डच्या फोटोंवरुन हे जवळपास स्पष्ट होतं की, हे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांना परीक्षेपूर्वीच पेपरची माहिती देत होते. पण, आता आणखी एक प्रश्न चर्चेत आहे, तो म्हणजे, हा व्यवहार नेमका झाला कसा?
नीट पेपर फुटी प्रकरणात (NEET Exam Paper Leak Case) आतापर्यंत चार आरोपींचं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. लातूर येथील संजय जाधव, जरील खान, उमरखान पठाण यांचा अजून एक साथीदार याच भागातील आहे. इरणणा कोनगलवार, असं या प्रकरणातील चौथ्या आरोपीचं नाव असून धाराशिवमधील उमरगा जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या चारही आरोपींचा संपर्क दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीसोबत असल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच, नीट परीक्षेच्या पेपर्सच्या व्यवहारात दिल्लीतील व्यक्तीचा मोठा हात असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं कसं काम करायचं हे रॅकेट?
नीट परीक्षांमधील घोटाळ्यानं देशभरातली अनेकांच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले संजय जाधव आणि उमरखान पठाण यांच्या मोबाईलमध्ये बारा विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड सापडले आहेत. यावरुन हे स्पष्ट होतं की, हे लोक या विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांना परीक्षेपूर्वी पेपरची माहिती देत होते. त्यानंतर काही रक्कम स्वतःकडे ठेवून घेऊन उरलेली रक्कम दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीला पाठवत होते. त्यांच्या बँकेत खात्यातून मोठ्या प्रमाणातली आर्थिक उलाढाल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे, उत्तरेकडील राज्यात झालेल्या पेपर फुटी प्रकरणातील आरोपींची बँक खाती पोलिसांनी तपासल्यानंतर लातूरची लिंक लागल्याची माहिती समोर आली आहे.
शिक्षकांच्या मोबाईलमध्ये अॅडमिट कार्ड असलेले 'ते' 12 विद्यार्थी कोण?
संजय जाधव आणि उमरखान पठाण यांच्या मोबाईलमध्ये आढळून आलेल्या 12 अॅडमिट कार्डच्या आधारे पोलीस आता त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. काही विद्यार्थी आणि त्यांची पालकांची चौकशीही सुरू असल्याची माहिती आहे. आर्थिक व्यवहार किती रुपयांत ठरला होता. पैसे कशा पद्धतीनं पोहोचती केले? त्या विद्यार्थ्यांपर्यंत यांनी कोणत्या माध्यमातून संपर्क साधला? याचा तपास अद्याप पोलिसांकडून सुरू आहे.