मुंबई : तुम्हाला माहिती आहे का सिगारेटच्या धुरात पैसे वाया घालवण्यापेक्षा योग्य पैसे ठिकाणी गुंतवले तर या सिगारेटमध्ये गुंतवलेले पैसे तुम्हाला करोडपती बनवू शकतात. आपण हे सगळं समजून घेऊया अगदी उदाहरणासहित.. पण त्याआधी जागतिक तंबाखू दिनानिमित्त एका संशोधन अहवालातून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत त्याची माहिती जाणून घेऊया.


अहवालानुसार, गेल्या 30 वर्षांत देशातील तरुण धूम्रपान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. भारतात 15 ते 24 वर्षे वयोगटातील तरुण धूम्रपान करणाऱ्यांची संख्या 20 दशलक्षाहून अधिक आहे. एकूण 204 देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाचा अहवालात  जगभरात धूम्रपान करणाऱ्यांची संख्या 110 दशलक्ष झाली आहे. द लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या 'ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज' या अहवालातून नुकतीच ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये चीन आणि भारत आघाडीवर आहेत. पण, तुम्ही सर्वांनी विचार केला आहे का, की तुम्ही सिगारेटवर जितके पैसे खर्च करता तितके पैसे तुम्ही गुंतवले असते तर...? किती बचत होऊ शकते.. चला समजून घेऊया...


सिगारेटच्या व्यसनामुळे बँक बॅलन्स कमी होतो


धूम्रपान हे असे व्यसन आहे, ज्यावर तरुणाई सर्वाधिक खर्च करतात. हे केवळ तुमच्या आरोग्यालाच नाही तर तुमच्या आर्थिक आरोग्याला हानी पोहोचवते. कुटुंब, मित्र-नातेवाईक, डॉक्टर किंवा अगदी भागीदार नेहमीच सल्ला देतील की, तुम्ही ते सोडा. पण, मग फक्त आरोग्याचा विचार येतो पैशांचा विचार सहसा होत नाही. मात्र, जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनरचे म्हणणे ऐकले तर तुमच्या बँक बॅलन्सच्या आरोग्यासाठी सिगारेट किती हानिकारक आहे याची कल्पना येऊ शकते.


जर तुम्ही दररोज 200 रुपयांची सिगारेट ओढत असाल तर...


समजा एखादी व्यक्ती रोज सिगारेटचे पॅकेज विकत घेऊन सिगारेट पीत आहे. आता कोणत्याही मानक ब्रँडच्या 10 सिगारेटच्या पॅकची किंमत 200 रुपये आहे. आता फायनान्शियल प्लॅनरकडून समजून घ्या की, एका महिन्यात त्या व्यक्तीने फक्त 6000 रुपये धुरात खर्च केले. एका वर्षाचा हाच आकडा बघितला तर 72,000 रु. आता हे 72000 रुपये कुठेतरी गुंतवायचे असतील तर...


PPF मध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक करा


पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) सारख्या सरकारी हमी साधनामध्ये आपले पैसे गुंतवणाऱ्या कंजर्वेटिव गुंतवणूकदाराचे उदाहरण घेऊ. त्याची खासियत काय आहे - गुंतवलेले पैसे - त्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळालेली संपूर्ण रक्कम करमुक्त राहते. तुम्ही पीपीएफमध्ये दरमहा 6000 रुपये गुंतवल्यास तुमची गुंतवणूक एका वर्षात 72,000 रुपये होईल. नियमितपणे गुंतवणूक केल्यास ही रक्कम 15 वर्षांच्या कालावधीत 19 लाख 52 हजार 740 रुपये होईल. PPF ची किमान परिपक्वता मर्यादा 15 वर्षे आहे.


जर तुम्ही 20 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर...


जर तुम्ही ही रक्कम 20 वर्षे पीएफमध्ये जमा करत राहिल्यास ही रक्कम 31 लाख 95 हजार 978 लाख रुपये होईल. आता ती आणखी पाच वर्षे वाढवली तर 49 लाख 47 हजार 847 रुपये मिळतील. येथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की PPF ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. परंतु, दर तीन महिन्यांनी त्याचा व्याजदर निश्चित केला जातो. येथे आपण सध्याच्या 7.1 टक्के व्याजदरानुसार गणना केली आहे.


आता तुम्ही म्युच्युअल फंडात महिन्याला 6000 रुपये गुंतवले तर...


धूम्रपानावर खर्च केलेले पैसे 25 वर्षांसाठी म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दरमहा जमा केले तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 80 लाख 27 हजार 342 रुपये होते. येथे 10% वार्षिक परताव्याच्या आधारावर गणना केली जाते. आता जर तुम्ही ती 30 वर्षांसाठी वाढवली तर तुम्हाला 1 कोटी 36 लाख 75 हजार 952 रुपये परतावा मिळेल.


तज्ज्ञांच्या मते 10 टक्के परतावा अतिशय सामान्य आणि पुराणमतवादी (कंजर्वेटिव) आहे. डायव्हर्सिफाइड फंडांना १२ टक्के परतावा मिळणे सामान्य आहे. या दरानुसार 25 वर्षांत ही रक्कम 1 कोटी 13 लाख 85 हजार 811 रुपये आणि 30 वर्षांत ही रक्कम वाढून 2 कोटी 11 लाख 79 हजार 483 रुपये होईल.