मुंबई: देशातील करदाते आणि मोठे व्यवहार करणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) नुकत्याच जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 26 मे पासून व्यवहारांशी संबंधित आयकर नियमांमध्ये मोठे बदल केले जात आहेत.
सीबीडीटीच्या माहितीनुसार, आता एका वर्षात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त बँकिंग व्यवहारांसाठी पॅन आणि आधार अनिवार्य करण्यात आले आहे. बोर्डाने मे महिन्याच्या सुरुवातीला एक अधिसूचना जारी केली होती की, आता ग्राहकांना एका वर्षात 20 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी त्यांचे पॅन आणि आधार कार्ड अनिवार्यपणे सादर करावे लागेल.
पारदर्शकता वाढेल, करचोरी थांबेल
करचोरी रोखण्यासाठी हे पाऊल यशस्वी ठरेल, असे आयकर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या नियमामुळे व्यवहारात पारदर्शकता वाढेल. तसेच आता बँका, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी संस्थांना 20 लाखांहून अधिकच्या व्यवहारांची माहिती द्यावी लागणार आहे. याशिवाय आता कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खाते किंवा कॅश क्रेडिट खाते उघडण्यासाठी ग्राहकाला त्याचा पॅन आणि आधारची माहितीही द्यावी लागणार आहे.
पॅन नसेल तर आधार चालेल
सध्या आयकर विभागाच्या प्रकरणांमध्ये पॅन सर्वत्र वापरला जातो. प्रत्येक करदात्याला त्यांचे पॅन कार्ड टॅक्स पोर्टलवर अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, उद्यापासून लागू होणाऱ्या नव्या नियमात ग्राहकांना काही शिथिलता देण्यात आली आहे.
केवळ करचोरी रोखण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. बँकेत व्यवहार करताना जर एखाद्या व्यक्तीकडे पॅनकार्ड नसेल, तर तो आधारची बायोमेट्रिक ओळख देऊ शकतो. कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मोठ्या व्यवहारांमध्ये पॅन तपशील दिल्यास करचोरी रोखणे सोपे होईल आणि यामुळे सरकारचा महसूलही वाढेल.
महत्त्वाच्या बातम्या:
- FY2021-22 मध्ये आर्थिक विकासदर 9.2 टक्के राहू शकतो, या अहवालात करण्यात आला दावा
- Bank Privatisation: 'या' 2 सरकारी बँकांचे लवकरच होणार खासगीकरण; आताच तपासा तुमचेही आहे का खाते?