Fixed Deposit Interest Hikes: भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या व्याज दराचा परिणाम देशातील बँकांवरही दिसून येत आहे. मागील काही महिन्यांपासून देशातील जवळपास प्रत्येक बँकेने कर्जावरील व्याज दर (Interest Rate) आणि ठेवींवरील व्याज वाढवले आहेत. खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक 'बँक ऑफ महाराष्ट्र' ने (Bank Of Maharashtra) मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. ही नवी व्याज दरवाढ दोन कोटींपेक्षा कमी रक्कमेच्या मुदत ठेवीवर करण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेने दोन कोटींपेक्षा कमी मुदत ठेवीवर 35 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे.
रिझर्व्ह बँकेने व्याज दरात मे महिन्यापासून चार वेळेस वाढ केली आहे. मागील व्याज दरवाढ सप्टेंबर महिन्यात केली होती. सध्या रेपो दर हा 5.90 टक्के इतका झाला आहे. या व्याज दरवाढीनंतर बँकांकडून सातत्याने व्याज दरात आणि ठेवींवरील व्याज दरात वाढ केली आहे. एचडीएफसी आणि बँक ऑफ महाराष्ट्रने मुदत ठेवींवरील व्याज दरात वाढ केली आहे.
एचडीएफसी बँकेचा दिलासा
एचडीएफसी बँकेने दोन कोटींपेक्षा कमी रक्कमेच्या मुदत ठेवीवरील व्याज दरात 8 नोव्हेंबर 2022 पासून लागू केले आहेत. बँकेने सामान्य ग्राहकांसाठी सात दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर 3 टक्के ते 6.25 टक्के व्याज दर लागू असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के ते 7 टक्क्यांपर्यंत व्याज दर लागू असणार आहे.
एचडीएफसी बँकेकडून 7 दिवस ते 29 दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवीवर 3 टक्के व्याज दर लागू केला आहे. तर, 30 दिवस ते 45 दिवसांच्या मुदत ठेवीवर 3.50 टक्के, 46 दिवस ते 60 दिवसांच्या मुदत ठेवीवर 4 टक्के व्याज दर लागू करण्यात आला आहे. 61 ते 89 दिवसांच्या मुदत ठेवीवर 4.50 टक्के, 90 दिवस ते सहा महिन्यांच्या मुदत ठेवीवर 4.50 टक्के, सहा ते 9 महिन्यांच्या मुदत ठेवीवर 5.25 टक्के व्याज दर एचडीएफसी बँकेकडून देण्यात येत आहे. तर, एक वर्ष ते 15 महिन्यांच्या मुदत ठेवीवर 6.10 टक्के, 15 महिने ते 18 महिन्यांच्या मुदतीवर 6.40 टक्के, 18 महिने ते पाच वर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवर 6.50 टक्के आणि पाच वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर 6.25 टक्के व्याज दर एचडीएफसी बँक देत आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रकडून व्याज दरात वाढ
'बँक ऑफ महाराष्ट्र'नेदेखील मुदत ठेवींवरील व्याज दरात वाढ केली आहे. ही व्याज दरवाढ 9 नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आली आहे. बँकेने सात दिवसांपासून ते 10 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवर 2.75 टक्के ते 5.75 टक्क्यांपर्यंत व्याज दर वाढवले आहेत. ग्राहकांना 400 दिवसांच्या मुदत ठेव योजना असलेली 'महा धनवर्षा' योजनेत 6.30 टक्के व्याज मिळतो.
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 7 ते 30 दिवसांच्या मुदत ठेवीवर 2.75 टक्के, 31 ते 45 दिवसांच्या मुदत ठेवीवर 3 टक्के, 46 ते 90 दिवसांच्या मुदत ठेवीवर 3.50 टक्के व्याज दर लागू करण्यात आला आहे. 91 ते 119 दिवसांच्या मुदत ठेवीवर 4.50 टक्के, 120 ते 180 दिवसांच्या मुदत ठेवीवर 4.75 टक्के, 181 ते 270 दिवसांसाठी 5.25 टक्के, 271 ते 299 दिवसांसाठी 5.50 टक्के व्याज दर लागू आहे. 300 दिवसांच्या एफडीवर 5.85 टक्के व्याज लागू केला आहे. 301 दिवस ते 364 दिवसांच्या मुदत ठेवीसाठी 5.50 टक्के व्याज दर लागू करण्यात आला आहे. तर, 365 दिवसांच्या मुदत ठेवीसाठी 6 टक्के व्याज दर लागू करण्यात आला आहे. एक वर्ष ते 399 दिवसांच्या मुदत ठेवीवर 6 टक्के, 400 दिवसांच्या मुदत ठेवीवर 6.30 टक्के व्याज दर मिळत आहे. तर, तीन ते पाच वर्षांसाठीच्या मुदत ठेवीसाठी 5.75 टक्के आणि पाच वर्षांहून अधिक काळाच्या मुदत ठेवीवर 5.75 टक्के व्याज दर लागू करण्यात आला आहे.