FD Interest Rate : प्रत्येक जण आपल्या पगारातील काही रक्कम वाचवून त्याची गुंतवणूक करण्याचा विचार करतो. ज्यामुळे त्यांना पैसै गुंतवून भविष्य सुरक्षित करता येईल. बचती करण्यासाठी बँकांच्या मुदत ठेव योजना (FD Scheme) हा एक लोकप्रिय आणि उत्तम पर्याय बनला आहे. लोक बचतीसाठी एफडी (FD) योजनांना पसंती देतात, ज्यामध्ये पैसे सुरक्षित राहतात आणि चांगला परतावाही मिळतो. गेल्या वर्षी महागाईने कळस गाठला, रेपो दरात एकापाठोपाठ एक वाढ झाली, हे सगळं होत असतानाही बँकांनी एफडीचे दर वाढवून ग्राहकांना दिलासा दिला ज्यामुळे एफडी योजनेला ग्राहकांनी प्राधान्य दिलं आणि हा ट्रेंड अजूनही कायम आहे. तुम्हालाही बँक एफडीवर 9 टक्क्यांहून अधिक व्याज दर मिळवून भरघोस परतावा मिळवण्याची संधी आहे.


एफडीवर 9.21 टक्के व्याज


फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक (Fincare Small Finance Bank) ग्राहकांना एफडी वर 9 टक्क्यांहून (FD Interest Rate) अधिक व्याज देत आहे. एफडीवर 9.21 टक्के व्याज मिळविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना 750 दिवस बँकेत एफडी करावी लागेल. बँकेच्या बदलानुसार, एफडी (FD) वरील नवे व्याजदर 28 ऑक्टोबर 2023 पासून लागू झाले आहेत. दोन कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीसाठी एफडी दरांमध्ये बदल करण्यात आला आहे.


ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम पर्याय


एफडी (FD) वर 9 टक्के व्याज देणाऱ्या अनेक बँका आहेत, पण फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक (Fincare Small Finance Bank) 9.21 टक्के व्याजदर ऑफर करून सर्वात जास्त व्याज देणारी बँक आहे. एफडीवर हा उच्च व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी दिला जात आहे. सामान्य नागरिकांसाठी एफडीतील गुंतवणुकीवर जास्तीत जास्त 8.61 टक्के व्याज दिले जात आहे. अलीकडेच, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेने एफडीवरील व्याजदरांमध्ये बदल जाहीर करून आपल्या ग्राहकांना दिवाळीआधीच खास भेट दिली होती.


फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेचे नवे व्याजदर


फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेत वेगवेगळ्या कालावधीसाठी एफडीवर दिले जाणारे व्याजदर पाहिल्यास, सामान्य नागरिकांना 7 ते 14 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के, 15 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के व्याज मिळू शकते. 30 दिवसांच्या ठेवीवर 4.50 टक्के व्याज, 31 ते 45 दिवसांच्या ठेवींवर 5.25 टक्के आणि 46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 5.76 टक्के व्याज मिळत आहे. तसेच, 91 ते 180 दिवसांच्या FD वर 6.25 टक्के व्याज, 181 दिवस ते एक वर्ष म्हणजेच 365 दिवसांच्या FD वर 6.50 टक्के व्याज आणि 12 ते 15 महिन्यांच्या गुंतवणुकीवर 7.50 टक्के व्याज फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक देत आहे.


'या' बँकांकडूनही एफडीवर चांगला व्याजदर


फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक व्यतिरिक्त, अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना FD वर चांगला व्याजदर देत आहेत. यामध्ये युनिटी स्मॉल फायनान्स बँक आहे, ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 9 टक्के व्याज देत आहे. तर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने 9.1 टक्के, DCB बँक 8.50 टक्के, RBL बँक 8.30 टक्के, IDFC फर्स्ट बँक 8.25 टक्के व्याज देत आहे.