EPFO Higher Pension : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO) सदस्यांना आता अधिक पेन्शन मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्यांना वाढीव पेन्शन (Higher Pension) हवी आहे, त्यांनी 3 मार्च 2023 पर्यंतचा पर्याय निवडावा अशी सूचना पीएफ विभागाने दिली आहे. एक सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. तर, 1 सप्टेंबर 2014 पासून तुम्ही EPF चे सदस्य असाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येईल. 


सर्व पगारदार कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि कर्मचारी निवृत्तीवेतन योजना (EPS) याचे लाभ EPFO द्वारे मिळतात. दर महिन्याला तुमच्या मूळ पगाराच्या १२ टक्के रक्कम तुमच्या EPF खात्यात जमा होते. कर्मचाऱ्याव्यतिरिक्त तेवढाच भाग कंपनी-मालकाच्या खात्यातून देखील जमा करण्यात येते. पण कंपनी मालकाच्या योगदानाचा एक भाग ईपीएस योजनेत जमा केला जातो.


तुम्ही निवृत्त होईपर्यंत EPS मध्ये एक चांगली रक्कम बचत होते. तुम्ही नोकरीतून निवृत्त झाल्यास दर महिन्याला तुम्हाला नियमितपणे पेन्शन मिळते. 


EPS हा कर्मचारी विशिष्ट कॉर्पस नाही. EPF मध्ये तुमच्यासाठी एक विशिष्ट रक्कम बाजूला काढलेली असते. तुमच्या निवृत्तीच्या वेळी तुम्ही जमा केलेली मुद्दल रक्कम ही व्याजासह काढू शकता. EPS हा कॉर्पस नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. 


EPFO च्या माध्यमातून तुम्हाला नियमित पेन्शनचा लाभ मिळू शकतो. EPS च्या माध्यमातून जमा केलेल्या निधीतून ही पेन्शन दिली जाते. तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुमच्या जोडीदाराला पेन्शनची 50 टक्के रक्कम मिळते. तुमचा आणि जोडीदाराचा दुर्देवी मृत्यू झाल्यास तुमच्या मुलांची 25 वर्षे पूर्ण होईपर्यंत विधवा पेन्शन म्हणून देय रक्कमेच्या 25 टक्के रक्कम मिळते. 


तुम्ही अधिकच्या पेन्शनचा पर्याय निवडावा का?


उच्च पेन्शन योगदानामुळे तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर मिळणारा EPF चा एकरकमी फंड कमी होतो. अधिकच्या पेन्शनचा पर्याय निवडावा की नाही, याबाबतही अनेकजण साशंकत आहेत. काही तज्ज्ञांनुसार, तुम्ही सध्या तिशी, चाळीशी अथवा पन्नाशीच्या उंबरठ्यावर असाल तर तुमचा आताचा पगार आणि 50 ते निवृत्ती दरम्यान किती पगार होऊ शकतो, याचा विचार करणे आवश्यक आहे. EPS हा नियमितपणे तुम्हाला पेन्शन मिळते. पेन्शन हा मार्केटशी निगडीत नाही. एका ठरलेल्या सूत्रांनुसार तुम्हाला EPS द्वारे पेन्शन मिळते. 


निवृत्तीनंतर तुम्हाला पीएफची एकरकमी मोठी रक्कम मिळते. या रक्कमेवर कोणताही कर नसतो. हे उत्पन्न करमुक्त असते. मात्र, पेन्शन तुम्हाला दरमहा मिळणार आणि ती करपात्र असेल याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.  पेन्शनचा लाभ कर्मचाऱ्यांना त्यांच्या हयातीत उपलब्ध असतो. कर्मचाऱ्याच्या निधनानंतर जोडीदाराला पेन्शनच्या 50 टक्के रक्कम मिळते ही बाबदेखील लक्षात घेण्यासारखी असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. 


आपल्या भविष्यकालीन आणि निवृत्तीकालीन फंडासाठी वैविध्यपणा असावे असेही काहीजण सुचवतात. ज्यांना अधिकच्या पेन्शनसाठी EPS मध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्याकडे उत्पन्नाचे इतर पर्याय आहेत का, याचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे काही आर्थिक सल्लागार सांगतात. भविष्यात काही अघटित घडल्यास, त्याला सामोरे जाण्यासाठी पुरेसे आर्थिक पाठबळ तुमच्याकडे, वारसांकडे आहे का? जर नसेल तर EPS साठी अधिक गुंतवणूक करू नये असेही तज्ज्ञांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: