मुंबई : प्रसिद्ध उद्योजक गौतम अदाणी फिनटेक कंपनी पेटीएममध्ये (Paytm) गुंतवणूक करणारआहेत, असा दावा केला जात होता. अनेक माध्यमांनी याबाबत वृत्तही दिलं होतं. पण आता पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. पेटीएम कंपनी विकण्यासंदर्भातील वृत्तांमध्ये काहीही तथ्य नाही, अस शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.  


गौतम अदाणी पेटीएमध्ये गुंतवणूक करत असल्याची होती चर्चा


गेल्या काही दिवसांपासून गौतम अदाणी यांचा अदाणी उद्योग समूह लवकरच फीनटेक क्षेत्रात उडी घेणार असल्याचे म्हटले जात होते. ही चर्चा चालू असतानाच अदाणी समूह फिनटेक कंपनी पेटीएममध्ये गुंतवणूक करणार आहे, अशी चर्चा चालू झाली. मात्र या केवळ चर्चा आहेत असे स्पष्टीकरण  शर्मा यांनी दिले. शेअर बाजार चालू होताच पेटीएमने राष्ट्रीय शेअर बाजाराकडे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे."आम्ही स्पष्ट करू इच्छितो की पेटीएम विक्रीसंदर्भात चालू असलेल्या चर्चा फक्त अफवा आहेत. आमची कोणासोबत कसलीही चर्चा चालू नाही. आम्ही सेबीच्या नियमांचे पालन करतो," असे फिनटेक पेटीएमने राष्ट्रीय शेअर बाजाराला सांगितले आहे.  


नेमका काय दावा केला जात होता? 


पेटीएम संदर्भात माध्यमांत वेगवेगळे वृत्त प्रकाशित केले जात होते. गौतम अदाणी आणि विजय शेखर यांची मंगळवारी (28 मे) अहमदाबाद येथे बैठक झाली आहे. या बैठकीत पेटीएमची मालकी काही प्रमाणात विकण्यासंदर्भात चर्चा झाली असून त्याला अंतिम रुप देण्यात आले आहे, असा दावा केला जात होता. तसेच गौतम अदाणी यांनी फिनटेक क्षेत्रात उतरण्याचे ठरवले असून त्यासाठी त्यांनी पेटीएममध्ये हिस्सा खरेदी करण्याचा पर्याय निवडला आहे, असे सांगितले जात होते  पण आता या चर्चा केवळ अफवा आहेत, असे आता स्पष्ट झाले आहे. 


पेटीएम जनरल इन्शुरन्स चालू न करण्याचा निर्णय 


दरम्यान पेटीमएमने नुकतेच विमा कंपनी पेटीएम जनरल इन्शुरन्स न चालवण्याचा निर्णय घेतला  आहे. पेटीएमने तसे विमा नियामक संस्था आयरडीएआयला सांगितले आहे. पेटीएमकडून पेटीएम जनरल इन्शुरन्ससाठी 950 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात होती. मात्र आता हा उपक्रम न राबवण्याचा निर्णय पेटीएमने घेतला आहे.


हेही वाचा :


आता बँकेचे व्यवहार करताना फ्रॉड होणार नाही, बँकेच्या नव्या 'सिस्टिम'मुळे येणार नवी क्रांती!


HDFC बँकेचा SMS अलर्टच्या सुविधेबाबत मोठा निर्णय; नवा नियम 25 जूनपासून लागू!


निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात नेमकं काय घडणार? जाणून घ्या मार्केटचा 20 वर्षांचा इतिहास!