मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. येत्या 4 जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार असून त्याचा शेअर बाजारावर (Share Market) परिणाम होतोय. यावेळी कोणाची सत्ता येणार, निकाल काय लागणार? या प्रश्नांमुळे गुंतवणूकदारांच्या मनात धाकधूक असून सध्या शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळतोय. दरम्यान, प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर शेअर बाजारात एख तर तेजी राहू शकते किंवा बाजार कोसळू शकतो. याच पार्श्वभूमीवर 4 जून रोजी नेमकं काय होऊ शकतं, याचा गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ आपापल्या पद्धतीने अंदाज लावत आहेत. 


निकालाआधीच गुंतवणूकदारांची दिवाळी 


गेल्या काही दिवसांपासून निकालाबाबत वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहेत. क्षणात बाजारात तेजी दिसत आहे तर दुसऱ्याच दिवशी सेन्सेक्स, निफ्टीत घसरण पाहायला मिळतेय. पण देशात निवडणुकीची प्रक्रिया चालू झाल्यापासून सेन्सेक्स 3500 अंकांनी वधारला आहे. त्यामुळे एकंदरीतच गुंतवणूकदारांची संपत्ती तब्बल 26 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. अनेकांनी सध्या शेअर बाजारात चांगला पैसा कमवला आहे. 19 फेब्रवारी रोजी देशात मतदानाची प्रक्रिया चालू झाली. त्या दिवशी सेन्सेक्स हा 71816 अंकांवर होता. 75170.45 अंकांवर आहे. म्हणजेच गेल्या साधारण दीड महिन्यातं सेन्सेक्स 3500 अंकांनी वधारला आहे. याच काळात मुंबई शेअर बजारावर असलेल्या कंपन्यांचे भांडवल 419.95 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.


शेअर बाजाराचा 20 वर्षांचा इतिहास काय सांगतो? 


प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या काळात भांडवली बाजारात मोठा चढ-उतार पाहायला मिळतो. वीस वर्षांपूर्वी म्हणजेच 2004 सालीदेखील हीच स्थिती पाहायला मिळाली. 2004 सालच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्त्वातील यूपीएने भाजपाच्या नेतृत्त्वातील एनडीएला पराभूत केले होते. म्हणजेच 2004 साली सत्तांतर झाले होते. त्यानंतर निफ्टी निर्देशांकात तब्बल  21.5 टक्क्यांनी घसरण झाली होती.  2009 साली यूपीएची सत्ता कायम राहिली होते. तेव्हा डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते. त्यावेळी निकालाच्या अगोदर निफ्टीमध्ये 22 टक्क्यांची तेजी आली होती. 2014 साली देशात सत्तांतर झाले. नरेंद्र मोदी हे देशाचे नवे पंतप्रधान झाले. या सत्तांतरादरम्यान निकालानंतर पहिल्या आठवड्यात निफ्टीमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली होती. 2019 साली भाजपने आपली सत्ता कायम राखली होती. तेव्हा निफ्टीमध्ये 3.5 टक्क्यांनी तेजी आली होती. 


यावेळी निकालानंतर नेमकं काय होणार? 


लोकसभा निवडणुकीचा निकाल काय येतो, त्यावरून भारतीय शेअर बाजाराची स्थिती अवलंबून असणार आहे. या निवडणुकीत आम्ही 400 पेक्षा अधिक जागा जिंकणार असा दावा भाजपकडून केला जातोय. तसे झाल्यास शेअर बाजारात तेजी दिसू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे तर भाजपाला 280 पेक्षा अधिक जागा मिळाल्यास बाजारात काही प्रमाणात घसरण दिसू शकते. भाजपचा 320 ते 330 जागांवर विजय झाल्यास बाजारात फारसा फरक पडणार नाही. तर भाजपचा पराभव झाल्यास किंवा कोणालाही ठोस बहुमत न मिळाल्यास बाजारातील अनिश्चितता वाढण्याची शक्यता आहे, असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.   


हेही वाचा :


मंगळवारी सुस्साट, बुधवारीही मुसंडी मारणार? हे 'पाच' पेनी स्टॉक्स पाडणार पैशांचा पाऊस


सरकारच्या तिजोरीत पैसेच पैसे! आरबीआयनंतर आता एलआयसी देणार 3662 कोटींचा लाभांश!