मुंबई : अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. जगातील प्रत्येक देश त्याच्या नागरिकांच्या या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. मात्र याच गरजांसाठी नागरिकांना धडपडावं लागत असेल, मोठे कष्ठ घ्यावे लागल असतील तर परिस्थिती गंभीर होऊन बसते. सध्या अशीच स्थिती पाकिस्तानची (Pakistan Inflation) झाली आहे. हा देश जगण्यासाठी सर्वांत महाग देश झाला आहे.
पाकिस्तानमध्ये 25 टक्के महागाई दर
आशियाई विकास बँकेने (एडीबी) नुकताच एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार आशियाई देशांपैकी पाकिस्तानमध्ये आयुष्य जगण्यासाठी (राहणीमानासाठी) लागणारा खर्च हा सर्वाधिक आहे. या देशात महागाई दर जास्त असल्यामुळे येथे जगण्यासाठी धडपडावं लागतंय. सध्या पाकिस्तानध्ये महागाई दर 25 टक्के आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने (एसबीपी) महागाई दर 21 टक्क्यांपर्यंत ठेवण्याचं लक्ष निश्चित केलं होतं. मात्र पाकिस्तानला हे लक्ष्य साधता आलेले नाही. याच कारणामुळे गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानी रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत सातत्याने घटत आहे. म्हणूनच रोजचे रेशन आणि गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांना मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागत आहेत. वस्तू महागल्यामुळे येथे नागरिकांची अडचण होत आहे. सध्या हा देश जीवन व्यतीत करण्यासाठी सर्वांत महागडा ठरत असला तरी सध्या या देशाची अर्थव्यवस्था 1.9 टक्क्यांनी वाढते आहे. ही बाब या देशासाठी काहीशी दिलासादायक असल्याचं म्हटलं जातंय.
पाकिस्तानी नागरिक मंदीमुळे हैराण
पाकिस्तान हा देश बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या संकटांना तोंड देतोय. येथे महागाई वाढलेली आहे. परिणामी या देशाला मंदीला तोंड द्यावं लागतंय. जागतिक बँकेने दिलेल्या माहितीनुसार महागाईमुळे पाकिस्तानचे साधारण एक कोटी लोक नव्याने गरिबीमध्ये ढकलले जाऊ शकतात. सध्या येथे 9.8 कोटी लोक याआधीच गरिबीत जगत आहेत. पाकिस्तानवर कर्जदेखील दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या मदतीने पाकिस्तान या संकटांवर मात करण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी पाकिस्तान घालून दिलेल्या नियमांचे पालन करतोय.
हेही वाचा :
आशियातील 'या' पाच कुटंबांकडे आहे गडगंज पैसा, सर्वांधिक श्रीमंतांमध्ये अंबानी परिवाराचा कितवा नंबर?