मुंबई : आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. मेहनतीच्या जोरावर ते श्रीमंत झाले आहेत. काही लोक मात्र वाममार्गाला जवळ करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात. सध्या अशाच एका अब्जधीश महिलेची जगभरात चर्चा होत आहे. या महिलेने आपल्या ताकदीचा वापर करून हजारो लोकांची फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे या महिलेने केलेल्या या फसवणुकीमुळे तिला थेट फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. या महिलेचे नाव थ्रोंग माय लॅन (Troung My Lan) असे आहे.
अब्जाधीश महिला नेमकी कोण आहे?
थ्रोंग माय लॅन नावाची ही महिला मूळची व्हिएतनाम देशातली रहिवासी आहे. ती व्हिएतनामच्या अब्जाधीशांपैकी एक आहे. तिला तेथील न्यायालयाने नुकतेच फाशीची शिक्षा सुनावली आहे. रियल इस्टेट क्षेत्रात या महिलेचे व्हिएतनाममध्ये मोठे नाव आहे. आपल्या श्रीमंतीचे इमले उभारत असताना या महिलेने व्हिएतनाममधील नियमांचे उल्लंघन करून अब्जावधी डॉलर्सचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या कित्येक दिवसांच्या सुनावणीनंतर या महिलेला थेट फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. व्हिएतनाममध्ये फाशीची शिक्षा गंभीरातील गंभीर गुन्ह्यांनाच दिली जाते. मात्र या महिलेला आर्थिक स्वरुपाच्या गुन्ह्यांत थेट फाशीची शिक्षा मिळाल्यामुळे जगभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या महिलेने केलेल्या घोटाळ्यामुळे व्हिएतनाममधील तब्बल 42 हजार लोक प्रभावित झाले आहेत. थ्रोंग माय लॅन नावाची ही अब्जाधीश महिला गेल्या दशकभरापासून हा आर्थिक घोटाळा करत असल्याचे समोर आले आहे.
अब्जावधी डॉलर्सचा घोटाळा केल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार ही महिला व्हिएतनामच्या हो ची मिन्ह या शहरात राहते. 67 वर्षीय थ्रोंग माय लॅन देशातील सर्वांत मोठ्या बँकांपैकी एक असणाऱ्या बँकेला चुना लावत असल्याचे समोर आले आहे. ही फसवणूक त्या गेल्या 11 वर्षांपासून करत आहेत. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार थ्रोंग माय लॅन या व्हिएतनामच्या प्रसिद्ध आणि मोठ्या उद्योगपती आहेत. त्या VTP ग्रुपच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या कंपनीकडू आलिशान अपार्टमेट्स, हॉटेल्स, कार्यालये, शॉपिंग मॉलची निर्मिती करण्याचे काम केले जाते. ऑक्टोबर 2022 साली या महिला उद्योगपतीवर व्हिएतनामच्या SCB बँकेत आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपानंतर त्यांच्याविरोधात तब्बल 12.5 अब्ज डॉलर्सचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र थ्रोंग माय लॅन यांनी बँकेची एकूण 27 अब्ज डॉलर्सची फसवणूक केल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
44 अब्ज डॉलर्सच्या कर्जात फसवणूक केल्याचा आरोप
थ्रोंग माय लॅन यांनी एससीबी बँकेकडून तब्बल 44 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले होते. याच कर्जप्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावताना या कर्जातील 27 अब्ज डॉलर्स बँकेला परत करण्याचा आदेश दिला. लॅन यांनी 2011 ते 2022 या काळात एससीबी बँकेवर अवैध पद्धतीने नियमंत्रण मिळून या बँकेचा उपयोग घोटाळा करण्यासाठी केला, असेही मत न्यायालयाने नोंदवले. मिळाळेल्या माहितीनुसार लॅन यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना सोबत घेत तब्बल 2,500 बेकायदा कर्ज घेतले. यामुळे बँकेला 27 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. या महिलेवरील आरोप सिद्ध करण्यासाठी तब्बल 2700 लोकांची साक्ष नोंदवण्यात आली. तब्बल 200 वकिलांची फौज उभी करण्यात आली होती. तर या महिलेविरोधात तब्बल 6 टन वजनाचे पुरावे न्यायालयात देण्यात आले होते.
रस्त्यावर सामान विकायच्या, आता अब्जाधीश
थ्रोंग माय लॅन चिनी-व्हिएतनामी परिवारातून येतात. त्यांचा जन्म 1956 साली झाला. आपल्या सुरुवातीच्या काळात त्या त्यांच्या आईसोबत रस्त्यावर बसून ब्यूटी प्रोडक्ट्स विकायच्या. मात्र नंतर त्यांनी आपल्या व्यवसायात प्रगती करत रियल इस्टेट व्यवसायात पाऊल ठेवले. आज त्या अब्जाधीश आहेत. लॅन यांनी 1992 साली आपल्या कुटुंबीयांना सोबत घेत VTP नावाच्या कंपनीची स्थापना केली. पुढच्या काही वर्षात या कंपनीने खूप प्रगती केली. त्यांनी 1992 साली हाँग-काँगचे एका दिग्गज इन्व्हेस्टर एरिक चू नप की यांच्यासोबत लग्न केले. दरम्यान, याच बँकिंग घोटाळ्यासंदर्भात थ्रोंग माय लॅन यांना आता फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र त्या या निर्णयाला आव्हान देणार आहेत.
हेही वाचा :
निवडणूक संपताच महागाई वाढणार? 'या' एका कारणामुळे खिशाला बसणार मोठी झळ!