आमची बॅलन्सशीट मजबूत, गुंतवणूकदारांना वाऱ्यावर सोडणार नाही; FPO मागे घेतल्यानंतर गौतम अदानींची हमी
Gautam Adanis Address To Investors : अदानी एंटरप्रायजेसने 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर विविध प्रतिक्रिया येत असतानाच अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी गुंतवणूकदांना उद्देशून व्हिडीओ जारी केला आहे.
Gautam Adanis Address To Investors : अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्समध्ये तब्बल 28 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर अदानी एंटरप्रायजेसने (Adani Enterprises) 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओ (FPO) मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयावर विविध प्रतिक्रिया येत असतानाच अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) यांनी पहिली प्रतिकिया दिली आहे. त्यांनी गुंतवणूकदांना उद्देशून व्हिडीओ जारी केला आहे. आमची बॅलन्सशीट मजबूत स्थितीत असून गुंतवणूकदारांचं नुकसान होऊ नय यासाठी हा एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं अदानी यांनी सांगितलं.
गौतम अदानी म्हणाले की, "एफपीओ मागे घेतल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटलं. मात्र बाजारातील अस्थिरता बघता नैतिकदृष्ट्या एफपीओ बाजारात आणणं चुकीचं असल्याचं आम्हाला वाटतं. मागच्या 40 वर्षात उद्योजक म्हणून गुंतवणूकदारांनी मला मोलाची साथ दिली आहे. मी जे सम्राज्य उभं केलं आहे हे गुंतवणूकदारांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे करु शकलो, माझं यश त्यांना समर्पित आहे."
आमची बॅलन्सशीट मजबूत स्थितीत : गौतम अदानी
गुंतवणूकदारांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी हमी देताना गौतम अदानी म्हणाले की, "माझ्या गुंतवणूकदारांचं हित माझ्यासाठी सर्वतोपरी आहे. गुंतवणूदारांचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. या निर्णयाचा प्रभाव आमच्या इतर कोणत्याही ऑपरेशन्सवर दिसणार नाही. सोबतच भविष्यातील प्लान्सवर देखील त्याचा प्रभाव पडणार नाही. आमची बॅलन्सशीट मजबूत स्थितीत आहे."
अदानी यांच्याकडून गुंतवणूकदार, शेअर होल्डर्सचे आभार
"संपूर्ण जगात आम्ही भागीदारी करत साम्राज्य उभं केलं आहे. एफपीओला देशातूनच नव्हे तर बाहेरुन देखील चांगला प्रतिसाद मिळाला. बॅंकर्स, इन्व्हेस्टर्स आणि शेअर होल्डर्सचा मी त्याबद्दल आभारी आहे. मागच्या आठवड्यातील बाजारातील अस्थिरता असूनही त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला, आमच्यावर विश्वास ठेवला याचा आभारी आहे. पुढील काळात देखील आम्हाला असाच प्रतिसाद मिळेल याची आशा आहे," असं अदानी यांनी म्हटलं.
दानी एंटरप्रायजेसने 20 हजार कोटींचा FPO मागे घेतला
अदानी समुहानं नुकताच अदानी एंटरप्राइजेज याचा FPO जारी केला होता. 31 जानेवारीपर्यंत गुंतवणूकधारकांना पैसे गुंतवण्याची संधी दिली होती. परंतु 1 फेब्रुवारी रोजी अदानी एंटरप्रायझेसने 20 हजार कोटींचा एफपीओ मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत कंपनीने एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला असून गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यात येणार असल्याचं देखील परिपत्रकात सांगितलं.
एफपीओ म्हणजे काय?
आयपीओ बाजारात आणल्यानंतर कंपनीला पुन्हा भांडवलीची गरज भासते. अशावेळी कंपनी पुन्हा आपले शेअर्स बाजारात विक्रीला काढते आणि याला एफपीओ म्हणजे फॉलो ऑन पब्लिक ऑफर असं म्हणतात. काही वेळा नव्याने शेअर्स जारी देखील केले जातात. एफपीओ नव्या आणि जुन्या गुंतवणूकदारांसाठी असतात.
संबंधित बातमी
Adani Enterprises FPO: अदानी एंटरप्रायझेसने FPO मागे घेतला, गुंतवणूकदारांचे पैसेही परत करणार