मुंबई : ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला असून त्याच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या पडताना दिसत आहेत. लॉन्च झाल्यानंतर केवळ दोनच दिवसात 1100 कोटी रुपयांच्या किंमतीच्या स्कूटरची विक्री करण्याची किमया ओलाने साधली आहे. कंपनीच्या या विक्रमी सेलची माहिती देताना ओलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अगरवाल यांनी भारतीयांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि प्रेमाबद्दल आभार मानले आहेत. 


 






ओला स्कूटरच्या खरेदीसाठी केवळ ओला अॅपवर नोंद करता येते. ही स्कूटर एकूण 10 रंगांमध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. ऑक्टोबर महिन्यापासून ओला आपल्या ग्राहकांना स्कूटरची डिलिव्हरी देणार आहे. 


ओला स्कूटरच्या लॉन्चिंगपूर्वी त्याबद्दल जी उत्सुकता  होती कदाचित त्याहून जास्त प्रतिसाद त्याच्या विक्रीला मिळाल्याचं दिसून येतंय. ही स्कूटर S-1 आणि S-1 Pro या दोन प्रकारांमध्ये येईल. ओला स्कूटर घरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 6 तास लागतील, परंतु ओलाच्या चार्जिंग सेंटरमधील उच्च चार्जिंग पॉईंटमधून 50 टक्के चार्जिंग फक्त 18 मिनिटांत होईल, असा दावा भाविश अग्रवाल यांनी केला. म्हणजे स्कूटर 18 मिनिट चार्ज केल्यास 75 किमी धावेल.  


ओला स्कूटरची किंमत किती? 
ओला स्कूटरच्या मॅक्सिमम स्पीड रेंजबद्दल सांगायचे तर तो 115 किलोमीटर प्रति तास आहे. ओला स्कूटर सिंगल चार्जवर 150 किमीपर्यंत धावेल. ओला इलेक्ट्रिक स्कूटर एस -1 ची एक्स-शोरूम किंमत 99 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे आणि एस -1 प्रोची किंमत 1 लाख 29 हजार 999 रुपये असेल. महाराष्ट्रात अनुदाना नंतर एस 1 स्कूटर 94,999 आणि एस 1 प्रो 1, 24,999 रुपयांना उपलब्ध होईल. तर दिल्लीत सबसिडीनंतर एस -1 केवळ 85,099 रुपयांमध्ये आणि एस -1 प्रो 1,10,149 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. 


संबंधित बातम्या :