Ola Scooter Launched : बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेली ओला इलेक्ट्रिक स्कूटर आज लॉन्च झाली आहे. कंपनीने स्वातंत्र्य दिनानिमित्त रविवारी आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये अनेक अनोखे फीचर्स असल्याचा दावा केला जात आहे.


मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरसंदर्भात लोकांमध्ये सर्वात मोठी शंका आहे तिच्या वेग आणि पिकअपबद्दल. ओला स्कूटर (Ola S1) फक्त 3 सेकंदात शून्य ते 40 किमी वेग गाठते. ओलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल म्हणाले की, ओला भारतात जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादन कारखाना तयार करेल. ही स्कूटर उत्तम डिझाईन आणि उत्तम तंत्रज्ञानाची असल्याचा दावा त्यांनी केला. ही स्कूटर S-1 आणि S-1 Pro या दोन प्रकारांमध्ये येईल. ओला स्कूटर घरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 6 तास लागतील, परंतु ओलाच्या चार्जिंग सेंटरमधील उच्च चार्जिंग पॉईंटमधून 50 टक्के चार्जिंग फक्त 18 मिनिटांत होईल, असा दावा भाविश अग्रवाल यांनी केला. म्हणजे स्कूटर 18 मिनिट चार्ज केल्यास 75 किमी धावेल.  


ओला स्कूटरची किंमत किती?


ओला स्कूटरच्या मॅक्सिमम स्पीड रेंजबद्दल सांगायचे तर तो 115 किलोमीटर प्रति तास आहे. ओला स्कूटर सिंगल चार्जवर 150 किमीपर्यंत धावेल. ओला इलेक्ट्रिक स्कूटर एस -1 ची एक्स-शोरूम किंमत 99 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे आणि एस -1 प्रोची किंमत 1 लाख 29 हजार 999 रुपये असेल. महाराष्ट्रात अनुदाना नंतर एस 1 स्कूटर 94,999 आणि एस 1 प्रो 1, 24,999 रुपयांना उपलब्ध होईल. तर दिल्लीत सबसिडीनंतर एस -1 केवळ 85,099 रुपयांमध्ये आणि एस -1 प्रो 1,10,149 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. 


स्कूटरमधील अॅडव्हान्स फीचर


या स्कूटरमध्ये क्रूझ कंट्रोल, लाईव्ह लोकेशन, ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टम अशा अॅडव्हान्स सुविधा देण्यात आल्या आहेत. सर्व पूर्णपणे रिमोट कंट्रोल केले जाऊ शकते. याशिवाय यात व्हॉईस कंट्रोल सिस्टमही देण्यात आली आहे. स्कूटरची विक्री 8 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि ऑक्टोबरपासून डिलिव्हरी सुरू होईल. ही स्कूटर एकूण 10 रंगांमध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. ओला स्कूटरमध्ये 3.4kWh ची बॅटरी असेल. याशिवाय, या स्कूटरमध्ये 7-इंच टच स्क्रीन डिस्प्ले असेल जो 4G कनेक्टिव्हिटीसह येईल.