मुंबई : 13 वर्षांपूर्वी मुंबई लोकलमधून पडल्यानं जोगेश्वरी मध्ये राहणाऱ्या रोशन जव्वादच्या (Roshan Jawwad) आयुष्यात मोठा अंधारच पसरला. दोन्ही पाय गमावल्यानं रोशनच्या आयुष्य थांबणार की काय अशी भीती वाटू लागली. मात्र जिद्दी रोशननं आयुष्यातला अंधार दूर करत यशाचा प्रकाश पाडत आपलं लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं. रोशन आता एमडी डॉक्टर झाली आहे.  


रोशनचे वडील भाजी विक्रेते. घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल. जोगेश्वरीच्या चाळीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या रोशनचं लहानपणापासूनचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. दहावीला 92 टक्क्यांच्या वर मार्क्स घेणारी रोशन अकरावीला असताना परीक्षा देऊन घरी परतताना  अंधेरी-जोगेश्वरी दरम्यान गर्दीमुळे धावत्या लोकलमधून ती खाली पडली. या अपघातात तिला दोन्ही पाय गमवावे लागले. मोठा आघात झाला असतानाही डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द मात्र कायम ठेवली आणि आज ती डॉ. रोशन जवाद अहमद शेख झाली आहे. 



न्यायालयाचा 'तो' आदेश आणि बदललं आयुष्य
रोशन वैद्यकीय प्रवेश परीक्षा ती उत्तीर्ण झाली मात्र 88 टक्के अपंगत्वाचे कारण पुढे करत तिला मेडिकलला प्रवेश नाकारण्यात आला. यानंतर तिनं 2011 मध्ये उच्च न्यायालयात याचिका करून दाद मागितली होती.  तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांनी 'ती न्यायालयापर्यंत येऊ शकते तर कॉलेजमध्ये का जाऊ शकणार नाही?' असा सवाल करत तिला प्रवेश देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. 


Monika More : किरीट सोमय्यांकडून मोनिका मोरेला मदतीचा 'हात', मोनिका आता छोटीमोठी कामं करू शकणार
 
राजकीय नेत्यांची मदत 
रोशनच्या या अपघातानंतर तिला राजकीय नेत्यांनी देखील मोलाची मदत केली. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यामुळे तिला कृत्रिम पाय मिळाले. याच कृत्रिम पायांच्या आधारे तिने पुन्हा नव्याने जीवनाला सुरुवात केली. काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी तिच्या एमबीबीएस ते एमडीपर्यंतचा सर्व खर्च केला.   केवळ एमबीबीएस करुन ती थांबली नाही तर केईएम रुग्णालयात प्रवेश घेत एमडी डॉक्टर झाली आहे. तिने पॅथॉलॉजी विभागातून एमडीचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.