मुंबई : सध्या भांडवली बाजारात रोज नवनवे आयपीओ (IPO) येत आहेत. विशेष म्हणजे या आयपीओंचे स्वागतही गुंतवणूकदार जोमाने करत आहेत. नुकतेच भारती हेक्झाकॉमचा आयपीओ (Bharti Hexacom IPO) आला होता. हा आयपीओ प्रत्यक्ष शेअर बाजारात येताच त्याने धुमाकूळ घातला आहे. मुंबई शेअर बाजारावर (BSE) सुचिबद्ध होताच या कंपनीचे समभाग थेट 32 टक्क्यांनी वाढले. त्यानंतर आता एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा (NTPC Green Energy) आयपीओ येत असून यातून चक्क दहा हजार कोटी रुपयांचा निधी उभारला जाणार आहे.


याआधी एलआयसीने 2022 मध्ये आपला आयपीओ आणला होता. एनटीपीसी ग्रीन एनर्जी हा एका सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने आणलेला दुसऱ्या क्रमांचा सर्वांत मोठा आयपीओ आहे. आयपीओच्या माध्यमातून उभारलेला निधी सोलार एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया यांची निर्मिती करण्यासाठी वापरला जाणार आहे. 


चार बँकांवर जबाबदारी


मिळालेल्या माहितीनुसार एनटीपीसी ग्रीन एनर्जीने आयपीओच्या देखभालीसाठी चार बँकांची निवड केली आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार आतापर्यंत 12 इन्व्हेस्टमेंट बँकांनी या आयपीओत रस दाखवला होता. मात्र एनटीपीसी ग्रीन एनर्जीने आयडीबीआय कॅपीटल मार्केट्स अँड सिक्योरिटिज, एचडीएफसी बँक, आयआय एफएल सिक्योरिटीज, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट या चार बँकांकडे या आयपीओची आर्थिक व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी असेल. या शर्यतीत गोल्डमॅन सॅच्स, अॅक्सिस कॅपिटल, आयसीआयसीआय सिक्योरिटिज, डॅम कॅपिटल आदी बँका होत्या. 


एनटीपीसी ग्रीन एनर्जी ही एनटीपीसीची उपकंपनी 


एनटीपीसी ग्रीन एनर्जी ही एनटीपीसी कंपनीची उपकंपनी आहे.  या कंपनीची एप्रिल 2022 मध्ये स्थापना करण्यात आली होती. याआधी एनटीपीसीने या कंपनीचा 20 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठीची तयारीदेखील करण्यात आली होती. मलेशियातील उर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपनी पेट्रोनास या कंपनीने हा 20 टक्के हिस्सा खऱेदी करण्याची तयारी दाखवली होती. त्यासाठी ही कंपनी एनटीपीसीला तब्बल 46 कोटी डॉलर्स द्यायला तयार होती. मात्र नंतर एनटीपीसीने हा करार रद्द करून एनटीपीसी ग्रीन एनर्जीची हिस्सेदारी विकण्यास नकार दिला होता. 


एनटीपीसी ग्रीन एनर्जी काय करते? 


एनटीपीसी ग्रीन एनर्जी ही कंपनी अपारंपरिक उर्जानिर्मितीवर काम करते. या कंपनीचे सीईओ मोहित भार्गव यांनी सध्या चर्चेत असलेल्या आयपीओबद्दल सविस्तर सांगितले होते. 2025 साली या कंपनीचा आयपीओ येणार आहे, असे ते म्हणाले होते. सध्या ही कंपनी 8 गिगावॅट उर्जा निर्माण करू शकणाऱ्या प्लान्टनिर्मितीवर काम करत आहे. या प्लान्टची क्षमता 25 गिगावॅटपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याआधी एलआयसीचा मे 2022 मध्ये 21 हजार कोटी क्षमतेचा आयपीओ आला होता. 


हेही वाचा :


घरात पाळीव प्राणी असल्यास मिळणार भरघोस सुट्ट्या, आता कर्मचाऱ्यांची मज्जाच मज्जा!


टाटा घराण्यातील 'ही' तीन नावे माहीत आहेत का? लाईमलाईटपासून दूर, पण सांभाळतायत कोट्यवधींचे उद्योग!