मुंबई : तुम्हाला सिक लिव्ह, अर्न लिव्ह, कॅज्यूअल लिव्ह अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुट्ट्या माहिती असतील. कर्मचाऱ्यांना वेळोवेळी या सुट्ट्या सोईनुसार वापरता येतात. आता मात्र कर्मचाऱ्यांचे धकाधकीचे आयुष्य लक्षात घेता वेगवेगळ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सुट्ट्यांची वेगवेगळी धोरणं लागू करत आहेत. नुकतंच एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ब्रेकअप लिव्ह (Break Up Leave) लागू केली होती. आता आणखी एका कंपनीने आगळ्या-वेगळ्या कारणासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी (Swiggy Leave Policy) देण्याचं ठरवलं आहे. 


पाळीव प्राणी पाळल्यावर मिळणार सुट्टी


स्विगी या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीने हे आगळं-वेगळं धोरण लागू केलं आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला घरी प्राणी पाळायचे असतील तर ही कंपनी कर्मचाऱ्यांना विशेष लिव्ह देणार आहे. चिफ ह्यूमन रिसोर्स ऑफिस गिरीश मेनन यांनी याबाबत माहिती दिली आहे. आमच्या कर्मचाऱ्यांना पुरक वातावरण मिळावे, यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक निर्णयाला आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे. आम्ही याआधी लागू केलेली पॅटर्निटी लिव्ह पॉलीसी त्याचाच एक भाग होती. आता आम्ही ज्या कर्मचाऱ्यांनी घरी पाळीव प्राणी पाळलेले आहेत, त्यांना पाठिंबा देणार आहोत. आमचा एखादा कर्मचारी प्राणी पाळू इच्छित असेल तर त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असे मेनन यांनी सांगितले. 


सुट्ट्यांचे नेमके धोरण काय? 


पाळीव प्राणी असलेल्या किंवा पाळीव प्राणी पाळण्याचा विचार करणाऱ्या स्विगीच्या कर्मचाऱ्यांसाठी सुट्ट्यांचे नवे धोरण लागू असेल. यातही कंपनीतील पूर्णवेळ कर्मचाऱ्यांनाच हे धोरण लागू असेल. येत्या 11 एप्रिलपासून हे धोरण प्रत्यक्ष लागू केले जाईल. 


पाळण्यासाठी प्राणी घेत असाल तर लिव्ह मिळणार 


स्विगीत काम करणारा एखादा कर्मचारी प्राणी पाळण्याच्या विचारात असेल तर त्याला एका दिवसाची अतिरिक्त सुट्टी मिळेल. या सुट्टीमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्राण्यांसोबत फिरायला मिळेल. गरज पडल्यास कर्मचाऱ्यांना या काळात वर्क फ्रॉम होमचीही परवानगी दिली जाणार आहे.


 पाळीव प्राण्याचा मृत्यू झाल्यास मिळणार सुट्टी


स्विगीच्या नव्या धोरणानुसार घरात पाळलेला प्राणी आजारी असेल तर कर्मचारी थेट सिक लिव्हसाठी अर्ज करू शकतो. सिक लिव्ह घेऊन कर्मचारी प्राण्याची काळजी घेऊ शकतो. चुकून घरातील प्राण्याचा मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यासह त्याचे कुटुंबीय दु:खी असतात. अशा वेळी दु:खातून सावरण्यासाठीही कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळू शकते. 


पॅरेन्टल पॉलिसिची झाली होती चर्चा


स्विगीच्या या नव्या धोरणाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. याच कंपनीने 2020 साली नवी पॅरेंन्टल पॉलिसी लागू केली होती. लिंगाचा विचार न करता लागू केलेल्या या धोरणाची तेव्हा चांगलीच चर्चा झाली होती. 


हेही वाचा :


टाटा घराण्यातील 'ही' तीन नावे माहीत आहेत का? लाईमलाईटपासून दूर, पण सांभाळतायत कोट्यवधींचे उद्योग!


 ब्रेकअप झालं की कर्मचाऱ्यांना मिळणार 'ब्रेकअप लिव्ह', 'या' कंपनीच्या नव्या धोरणाची चर्चा!