मुंबई : आर्थिक क्षेत्रातील देवाणघेवाण तसेच अन्य कामेदेखील तंत्रज्ञानामुळे बरीच सोपी झाली आहेत. आर्थिक व्यवहार हे विश्वासार्ह पद्धतीने व्हावेत, ग्राहकांसोबत कोणताही दगा-फटका होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी लागते. त्यासाठी संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी केवायसीची (What Is KYC) मदत घेतली जाते. मात्र यातही पारंपरिक पद्धतीने केली जाणारी केवायसी (Traditional KYC) आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या जोरावर केली जाणारी युनिफाईड केवायसी (Unified KYC) असे दोन मार्ग उपलब्ध आहेत. या दोन्ही केवायसींमध्ये नेमका फरक काय आहे? ते समजून घेऊ या... 


केवायसी म्हणजे काय?


केवायसी म्हणजे 'नो युअर कस्टमर'. आर्थिक देवाणघेवाण करताना संबंधित ग्रहकाची ओळख पटावी यासाठी केवायसीची मदत घेतली जाते. संबंधित व्यक्ती खरी आहे का, आर्थिक देवाणघेवाण योग्य माणसासोबत होत आहे का तसेच ग्राहकांची कोणतीही आर्थिक लूट, फसवणूक होणार नाही याची केवायसीच्या माध्यमातून खातरजमा केली जाते.  


पारंपरिक केवायसी म्हणजे काय?


पारंपरिक केवायसी आणि युनिफाईड केवायसीचे आपले स्वत:चे काही फायदे आणि तोटे आहेत. पारंपरिक केवायसी करताना ग्राहकाला संबंधित संस्थेला प्रत्यक्ष भेट द्यावी लागते. प्रत्यक्ष हजर राहून कागदपत्रांच्या सत्यप्रती दाखवाव्या लागतात. यामध्ये शासकीय ओळखपत्र, घराचा पुरावा, बँकेचे स्टेटमेंट अशा प्रकारची कागदपत्रे दाखवावी लागतात. संबंधित संस्था ही सर्व कागदपत्रे तपासते. ग्राहकाने दिलेल्या माहितीची तुलना खऱ्याखुऱ्या कागदपत्रांशी केली जाते. 


पारंपरिक केवायसीचा तोटा काय? 


खरं म्हणजे पारंपरिक केवायसीचे अनेक तोटे आहेत. यातलं सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पारंपरिक केवायसीचा पर्याय निवडल्यास संबंधित व्यक्तीला स्वत: उपस्थित राहावं लागतं. ही प्रक्रिया वेळखाऊ असते. ग्राहकांना संबंधित संस्थेच्या कार्यालयात जावे लागते. प्रवास करावा लागतो. इंधनासारख्या संसाधनांचा खर्च होतो. अशा पद्धतीच्या केवायसीमध्ये फसवणुकीचीही शक्यता असते. 


युनिफाईड केवायसी 


युनिफाईड केवायसीमध्ये आयडी व्हेरिफिकेशन, बायमॅट्रिक पद्धतीने ओळख पटवणे, एएमएल स्क्रीनिंग (ग्राहक आर्थिक गैरव्यवहारात अडकण्याची शक्यता आहे का हे तपासणे) इत्यादी प्रक्रिया पार पाडल्या जातात. युनिफाईड केवायसीच्या मदतीने संबंधित व्यक्तीची ओळख लवकरात लवकर कशी पटवता येईल, यासाठी प्रयत्न केला जातो. 


युनिफाईड केवायसीचा फायदा काय?


पारंपरिक केवायसी पद्धत ही संपूर्णत: मानवी प्रकिया आहे. या मध्ये पेपरचा समावेश आहे. तर युनिफाईड केवायसीमध्ये वेगवेगळा डेटा, स्वयंचलित प्रक्रिया यांच्या मदतीने ग्राहकांची ओळख पटवली जाते. युनिफाईड केवायसीमध्ये व्हिडीओ कॉलिंगच्या मदतीनेही संबंधित व्यक्तीची ओळख पटवली जाते. या प्रकारच्या केवायसीमुळे वेळेची आणि संसाधनांची बचत होते.