नवी दिल्ली : आयटी क्षेत्रातील देशातील नामवंत कंपनी इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारतासमोरील आताच्या काळातील सर्वात मोठं आव्हान कोणतं याबाबत चर्चा केली. अर्थशास्त्र आणि देशाची लोकसंख्या डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून फायदेशीर ठरणार असल्याचं म्हणत असताना नारायण मूर्ती यांनी वेगानं वाढणारी लोकसंख्या देशाच्या स्थैर्याला मोठं आव्हान असल्याचं म्हटलं.
नारायण मूर्ती यांनी लोकसंख्येच्या समस्येसंदर्भातील हे वक्तव्य उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये केलं. प्रयागराजमध्ये मोतीलाल नेहरु नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. नारायण मूर्ती हे प्रमुख पाहुणे होते. ते म्हणाले, देशात आणीबाणीनंतर लोकसंख्येच्या समस्यावेर कुणी लक्ष दिलं नाही, त्यामुळं आता देशाचं भविष्य संकटात आहे.
लोकसंख्येमुळं भारतासमोर अनेक गंभीर आव्हानं निर्माण होत असल्याचं नारायण मूर्ती म्हणाले.यासाठी त्यांनी जमिनीची प्रती व्यक्ती उपलब्धता, आरोग्य सुविधांचा दाखला दिला. भारताच्या तुलनेत अमेरिका, ब्राझील आणि चीन सारख्या देशात प्रती व्यक्ती जमीन उपलब्धता जास्त आहे. आपण आणीबाणीनंतर लोकसंख्येच्या मुद्याकडे लक्ष दिलं नाही आता त्यामुळं देशाच्या स्थैर्यापुढं धोका निर्माण झाल्याचं नारायण मूर्ती म्हणाले.
लोकसंख्येत भारतानं चीनला मागं टाकलं
भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. अनेक वर्षांपासून चीन लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या स्थानावर होता. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या 144 कोटी इतकी आहे. तर चीनची लोकसंख्या 142 कोटी आहे. भारताची काही वाढलेली लोकसंख्या फायद्याची गोष्ट असल्याचं देखील काही तज्ज्ञ म्हणतात. ते यासाठी डेमोग्रॅफिक डिव्हिडंडचा दाखला देतात.
चीनसोबतच्या तुलनेबाबत आक्षेप
नारायण मूर्ती म्हणतात भारताला ग्लोबल लीडर असं म्हणनं अतिघाईचं ठरेल. चीन जगाची फॅक्टरी बनलेला आहे. इतर देशाच्या सुपरमार्केट आणि होम डेपोमध्ये 90 टक्के साहित्य चीनमध्ये बनवलेलं असतं. आता त्यांची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत सहा पट आहे. त्यामुळं भारत उत्पादनाचं हब बनेल असं म्हणनं चुकीचं ठरेल, असंही नारायण मूर्ती म्हणाले.
संबंधित बातम्या :