सिंधुदुर्ग : राज्यात रक्षाबंधन सणाचा उत्साह असून देशभर बहीण-भावाच्या नात्याची, प्रेमाची जपणूक करणारा सण साजरा होत आहे. तर, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हा एकत्रच सण साजरा होतो. त्यामुळे, मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांमध्येही या सणाचा वेगळाच उत्साह असतो. या दिवशी समुद्राला नारळ वाहून मासेमारीसाठी बोटी समुद्रात उतरतात. त्यामुळे, या सणाचं कोळी बांधवांत व मासेमारी करणाऱ्यांमध्ये वेगळंच महत्त्व आहे. मात्र, नारळी पौर्णिमेदिवशीच दु:खद घटना घडली आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशीच मासेमारी पात (छोटी नौका) बुडून तीन खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात घडली. 


मालवण येथील सर्जेकोट समुद्रात रविवारी रात्री मासेमारी साठी गेलेल्या चार खलाशांपैकी तीन खलाशांचा आचरा समुद्रात बुडून मृत्यू झाला असून सुदैवाने एका खलाशाने पोहत किनारा गाठला. समुद्रात निर्माण झालेल्या धुक्यामुळे बोट दगडाला आपटून पलटी झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनं ऐन नारळी पौर्णिमेच्या सणादिवशीच गावावर शोककळा पसरली. बुडालेल्या तिघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून आचरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. 


कोळी बांधवांनी समुद्रात नारळ सोडला


नारळी पौर्णिमेनिमित्त आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथे समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला. समुद्रामध्ये असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यामधून सोन्याचा नारळ प्रथम समुद्राला अर्पण केला जातो, त्यानंतर समस्त जिल्हावासीय ठीक ठिकाणी समुद्राला नारळ अर्पण करतात. नारळी पौर्णिमाला समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने समुद्र शांत राहावा यासाठी पूजा करुन नारळ अर्पण करतात. मोठ्या संख्येने मच्छीमार, मालवण मधील व्यापारी बांधव उपस्थित राहतात. उद्यापासून खऱ्या अर्थाने मच्छीमार बांधव मासेमारीला सुरुवात करतात.


नारळ लढवणे स्पर्धेत महिलांचा उत्स्फुर्त सहभाग


नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने सिंधुदुर्गातील मालवणमध्ये नारळ लढवणे स्पर्धा घेतल्या जातात. या नारळ लढवणे स्पर्धेत मोठ्या संख्येने महिला पारंपारिक वेशभूषेत सहभागी होतात. यावेळीही महिलांचीही मोठी गर्दी दिसून आली. मालवण मधील बंदर जेठी परिसरात या स्पर्धा घेतल्या जातात. नारळ लढवणे ही एक कला असून ज्या स्पर्धकांच्या हातातील नारळ फुटेल तो स्पर्धक बाद होतो. नेहमी बाजारात येणारे नारळ या स्पर्धेत वापरले जात नाहीत, कारण ते एकावर एक आपटले की लगेच फुटतात. त्यामुळे कठीण कवच असलेले नारळ या स्पर्धेत वापरले जातात. या नारळ लढवणे स्पर्धेत महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षीस दिली जातात, त्यामुळे मोठ्या संख्येने महिला या स्पर्धेत भाग घेतात.


गोवळकोट येथे पारंपारिक पद्धतीने नारळी पौर्णिमा संपन्न 


चिपळूणमधील संस्कृती जपणार गाव म्हणजे गोवळकोट,आज नारळी पौर्णिमा निमित्त श्री देव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थान,वारकरी संप्रदाय आणि भोईवाडी येथील ग्रामस्थांनी आज शेकडो वर्षांची परंपरा जपत गोवळकोट धक्क्यावर नारळी पौर्णिमा निमित्त नारळ अर्पण केले. यावेळी गोवळकोट मधील सर्व वाड्यांमधून ग्रामस्थ हरीभजनाचा जप करत  गोवळकोट धक्क्यापर्यंत एकत्र येतात. भोईवाडी आणि गोवळकोट गावातून येणाऱ्या दींड्या गोवळकोट धक्यावर एकत्र होतात आणि सामूहिक पद्धतीने नारळ अर्पण केले जातात. नारळ अर्पण केल्यानंतर देवाला आरच घातला जातो.