मुंबई : राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सध्या सगळीकडे चर्चा आहे. या योजनेसाठी आजघडीला कोट्यवधी महिलांनी अर्ज केलेले असून त्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यावर सरकारने पैसे पाठवण्यास सुरुवातही केलेली आहे. 16 ऑगस्टपर्यंत सरकाने तब्बल 96 लाख 35 हजार महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये पाठवले आहेत. अजूनही पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवले जात आहेत. दरम्यान, महिलांना या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक महिन्यला 1500 रुपये देत आहेत. याच दीड हजार रुपयांच्या मदतीने महिला लखपती होऊ शकतात.
सप्टेंबर महिन्यात मिळणार 4500 रुपये
राज्य सरकारकडून पात्र महिलांना सध्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये दिले जात आहेत. सध्यातरी 31 जुलैपर्यंत ज्या महिलांचे अर्ज पात्र ठरवण्यात आलेले आहेत, त्या महिलांच्या बँक खात्यावर हा निधी पाठवला जात आहेत. तर 31 जुलैनंतर तसेच ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये दिले जातील. म्हणजेच सप्टेंबर महिन्यात पात्र महिलांना एकूण तीन महिन्यांचे पैसे दिले जाणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी घोषणा केलेली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पुण्यातील एका कार्यक्रमात अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या घोषणा केल्या होत्या. 3000 रुपये न मिळालेल्या पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात 4500 रुपये दिले जातील, अशे शिंदे म्हणाले होते. तसेच भविष्यात आमचे सरकार आल्यास प्रतिमहा मिळणारी ही आर्थिक मदत 3000 रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल, असे ते म्हणाले होते. यासह आम्ही सत्तेत आल्यास आम्ही पुढच्या पाच वर्षांत प्रत्येक पात्र महिलेला एकूण 90 हजार रुपये देऊ, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले होते. त्यामुळे या पैशांचा योग्य ठिकाणी वापर केला, तर महिलांना मिळत असलेल्या या पैशांचे मूल्य आणखी वाढू शकेल.
महिला लखपती कशा होतील?
प्रत्येक महिन्याला मिळत असलेले हे 1500 रुपये महिलांनी योग्य ठिकाणी गुंतवल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. हे पैसे मिळणाऱ्या महिलांपैकी अनेक महिला अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असू शकतात. पण योग्य मार्गदर्शन घेतल्यास किंवा घरातील सुशिक्षित सदस्याची मदत घेतल्यास महिला हे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवू शकतात. याच गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी एक पर्याय हा म्युच्यूअल फंडाचा आहे. लाकडी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे महिला एसआयपीद्वारे म्युच्यूअल फंडात गुंतवू शकतात. तसे केल्यास पाच वर्षांत मिळणाऱ्या या 90 हजार रुपयांचे पाच वर्षांत तब्बल 1,23,730 रुपये होऊ शकतात.
असे होणार 1,23,730 रुपये
एसआयपीत गुंतवलेल्या पैशांवर साधारण 12 टक्क्याने (वार्षिक) परतावा मिळतो असे गृहित धरले जाते. एसआयी म्हणजेच म्युच्यूअल फंड हा शेअर बाजाराशी निगडीत असतो. त्यामुळे भांडवली बाजारातील चढऊतार लक्षात घेता व्या परताव्याची टक्केवारी कमी-कधीक होऊ शकते. मात्र एसआयपीमध्ये गुंतवलेल्या पैशांवर सरासरी 12 टक्क्यांनी व्याज मिळते असे गृहित धरले जाते. त्यानुसार समजा एखाद्या पात्र महिलेला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये या प्रमाणे पाच वर्षांत 90 हजार रपये मिळाले आणि या महिलेने आलेल्या या 1500 रुपयांची एसआयपी केली तर पाच वर्षांत या 90 हजार रुपयांचे 1,23,730 रुपये होतील. अशा प्रकारे महिला त्यांना मिळालेल्या या पैशांचे मूल्य आणखी वाढवू शकतात.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
तुमच्या खात्यात अजून 3000 रुपये आले नाहीत? आता काय करावं? 'या' तीन गोष्टी समजून घ्या
लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी 'बँक सिडिंग स्टेटस' कसं चेक करायचं? जाणून घ्या A टू Z प्रक्रिया!