मुंबई : जरांगे पाटील हे कुणाचीतरी सुपारी घेऊन बोलत असून त्यांचा एक-एक खेळ आता उघड होत असल्याचं भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले. जरांगे पाटील, तुमच्यासारखे दगडाचे काळीज असलेले देवेंद्र फडणवीस नाहीत. त्यांना जर खुर्चीचा मोह असता तर ते राजीनामा द्यायला तयार झाले नसते असं प्रवीण दरेकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांना आरक्षण द्यायचं आहे पण देवेंद्र फडणवीस त्यामध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. त्याला प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं.
मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना प्रवीण दरेकर म्हणाले की, जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जो आरोप केला होता त्यावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा मोलाचा वाटा असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. फडणवीस साहेबांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जाहीर भूमिका घेतली. जर अडथळा आहे असे वाटत असेल तर मी राजीनामा देईन असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घेतली आणि जरांगे याचा खोटेपणा महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड झाला. पाटील, तुम्ही बोलला ते कुणाची सुपारी घेऊन बोलला का?
जरांगेंचा भंपकपणा रोज उघडा होतोय
खुर्चीचा मोह असता तर देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यायला तयार झाले नसते. मराठा समाजासाठी जो काम करतोय त्याला पश्चाताप कशाला होईल? कुणीतरी त्यांच्यावर आरोप केले, त्यामुळे देवेंद्र फडणवीस व्यथित निश्चितच झालेले आहेत. जरांगे तुम्ही तुमच्या कौतुकात मशगुल आहात. पण तुमचा भंपकपणा रोज उघड होतोय. जरांगे पाटील यांची प्रतिमा महाराष्ट्रातील माणसाच्या मनातून आता उतरू लागली आहे.
जरांगेंचे आरोप, फडणवीसांचे उत्तर
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर सुरुवातीपासून देवेंद्र फडणवीस राहिले आहेत. मराठा आरक्षणात फडणवीसांनी आडकाठी आणली या आरोपांचा त्यांनी पुन्हा पुनरुच्चार केला. त्यावर फडणवीसांनी आज मात्र शेवटी निर्वाणीचं उत्तर दिलं. मराठा आरक्षणाबाबत एकाही निर्णयात मी आडकाठी आणली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर पदाचा राजीनामा देऊन राजकारण सोडेन, अशी तयारीच देवेंद्र फडणवीसांनी दाखवली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही त्यावर स्पष्टीकरण दिलं. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची भूमिका महत्त्वाची राहिलीय अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दिली.
ही बातमी वाचा: