मुंबई : म्यूच्यूअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय सेबीने (SEBI) घेतला आहे. भांडवली बाजार नियमाक SEBI ने KYC च्या नियमांत काही शिथिलता दिली आहे. आधार आणि पॅन एकमेकांना लिंक नसले तरी आता गुंतवणूकदार म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक करू शकणार नाहीत. याआधी 1 एप्रिल 2024 च्या नियमानुसार ज्या गुंतवणूकदाराचे आधार-पॅनशी लिंक नाही, अशा गुंतवणूकदारांची केवायसी ऑन होल्ड ठेवण्यात आली होती. यामुळे गुंतवणूकदार म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक करू शकत नव्हते. तसेच त्यांनी केलेली गुंतवणूक रिडीमही करता येत नव्हती.
आता आधार-पॅन एकमेकांना लिंक नसले तरी केवायसी करता येणार
सेबीने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. आता आधार-पॅन एकमेकांशी लिंक नसले तरी अन्य कागदपत्रांच्या मादतीने केवायसी करता येणार आहे. शासकीय दृष्टीकोनातून अधिकृत मानले जाणारे आधार, पॅन व्होटर आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायनन्स या कागदपत्रांच्या माध्यमातून गुंतवणूकदार आता केवायसी करू शकतात. अशा प्रकारे केलेल्या केवायसीचे स्टेटस हे केवायसी रजिस्टर्ड म्हणून दाखवले जाईल.
...तर ज्या फंडासाठी केवायसी त्याच फंडात गुंतवणूक करता येणार
KYC registered असं स्टेटस असणाऱ्या गुंतवणूकदारांना मात्र काही मर्यादा येणार आहेत. अशा प्रकारचे गुंतवणूकदार त्यांनी ज्या फंडासाठी केवायसी केलेली आहे, त्याच फंडात गुंतवणूक करू शकतील. केवायसी न केलेल्या फंडांमध्ये ते गुंतवणूक करू शकणार नाहीत. ज्या गुंतवणूकदारांनी आधार-पॅन एकमेकांशी लिंक केलेले आहे आणि केवायसी पूर्ण केलेली आहे. त्यांचे केवायसी स्टेटस हे केवायसी व्हॅलिडेटेड असे दाखवले जाईल. असे गुंतवणूकदार सर्वच प्रकारच्या म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक करू शकतील.
नव्या फंडासाठी नव्याने केवायसी करावे लागणार
केवायसी रेजिस्टर्ड असं केवायसी स्टेटस असणाऱ्यांना प्रत्येक नव्या फंडात गुंतवणूक करण्यासाठी नव्याने केवायसी करावी लागेल. तुमचे केवायसी स्टेटस ऑन होल्ड असेल तर ईमेल, मोबाईल नंबर, पत्ता व्हेरिफाईड नाही, असे समजावे. केवायसी स्टेटस होल्ड असणारे गुंतवणूकदार कोणत्याच म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक करू शकणार नाहीत.
दरम्यान, सेबीने 14 मे रोजी घेतलेल्या निर्णयानुसार एखाद्या गुंतवणूकदाराचे केवायसी स्टेटस केवायसी व्हॅलिडेटेड किंवा रजिस्टर्ड नसल्यास ते करण्यासाठी केआरएच्या संकेतस्थळावर जाऊन ते योग्य कागदपत्र सादर करून ते केवायसी करू शकतात.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
SIP करताना 'ही' एक काळजी घ्या, अन्यथा मोठं नुकसान झालंच म्हणून समजा!
रॉकेटच्या वेगाने पैसे वाढणार, फक्त 15 वर्षांत व्हा करोडपती; जाणून घ्या 12-15-20 चा फॉर्म्यूला काय?
श्रीमंत व्हायचंय? मग फक्त 'या' पाच गोष्टी पाळा; संपत्ती वाढलीच म्हणून समजा!