मुंबई : राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. 14 ऑगस्टपासून अनेक महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी पाठवला जात आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये अनेक महिलांना मिळाले आहेत. अजूनही ही प्रक्रिया चालू असून येत्या 17 ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसल्यामुळे अनेक महिलांना हा लाभ मिळणार नाही. याच पार्श्वभूमीवर आपल्या आधार क्रमांकाशी बँक खाते लिंक आहे की नाही? कोणते बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे? हे जाणून घेण्याची प्रक्रिया समजून घेऊ या... 


बँकेला आधार संलग्न असणे गरजेचे


लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करताना तुम्ही दिलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही पात्र असूनदेखील सरकार तुम्हाला पैसे देणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे बँक सिडिंग स्टेटस जाणून आणि तुम्ही अर्जात दाखल केलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणे गरजेचे आहे.


बँक सिडिंग स्टेटस कसे तपासावे? 


>>> बँक सिडिंग स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला सर्वांत अगोदर युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या uidai.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. 


>>> त्यानंतर तुम्हाला हवी असलेली भाषा निवडायची आहे. 


>>> भाषा निवडल्यानंतर तुम्हाला 'आधार सर्व्हिसेस' नावाचा ऑप्शन दिसेल. 


>>> या ऑप्सनवर क्लिक केल्यावर पुढे 'आधार लिकिंग स्टेटस' असा पर्याय दिसेल.


>>> आधार लिकिंग स्टेटसवर क्लिक केल्यावर एक नवी विंडो उघडले. त्यात 'बँक सिडिंग स्टेटस' या ऑप्शनवर क्लिक करावे. 


>>> त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि समोर दिलेला कॅप्चा टाकून लॉगीन करावे. 


>>> त्यासाठी आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचे यूआयडीएआयच्या संकेतस्थळावर लॉगीन होईल. 


>>> त्यानंतर खाली बँक सिडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लीक केल्यावर तुमच्या तुमच्या आधार क्रमांकाशी कोणते बँक खाते संलग्न आहे, हे समजेल.


हेही वाचा :


Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण' योजनेसंदर्भात न्यायालयाचं भाष्य, संवादाचा भाग, ताशेरे ओढलेले नाहीत; सरकारी वकीलांची सारवासारव


लाडकी बहिण योजनेचे पैसे यायला सुरुवात, पहिल्या टप्प्यात किती महिलांना मिळणार लाभ? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती