मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे. मात्र त्यातच आता महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे. कारण शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorave) यांनी राष्ट्रवादी पक्ष अन् सुनील तटकरे विश्वासघातकी असल्याचे म्हणत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना डिवचले आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) कुचकामी मंत्री आहेत. असा हल्लाबोल केला आहे. यानंतर भाजप नेते जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी ए मिटकरी, तुझी पात्रता आहे का? असे म्हणत अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची थेट लायकीच काढली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच महायुतीत जोरदार राडा पाहायला मिळत आहे. 


महेंद्र थोरवेंचा तटकरेंवर हल्ला


रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे. कर्जत खोपोली खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शनिवारी एका कार्यक्रमात चक्क राष्ट्रवादी पक्ष आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महेंद्र थोरवे म्हणाले की, महायुतीत राहून भरघोस निधी मिळवून महायुतीविरोधात षडयंत्र रचण्याचे काम सुरू आहे. रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या आमदारांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच विजय मिळाला याचा विसर पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विश्वासघातकी पक्ष असून रायगड जिल्ह्याचे नेतृत्वदेखील विश्वासघातकी असल्याचा आरोप त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर नाव न घेता केला आहे. तसेच महायुतीत राहून गद्दारी करत असाल तर बाहेर पडा आणि समोरून लढा. महेंद्र थोरवे लढण्यासाठी सक्षम आहे, असे खुले आव्हानच सुनील तटकरे आणि सुधाकर घारे यांना महेंद्र थोरवेंनी दिले आहे. आता महेंद्र थोरवे यांच्या टीकेवर सुनील तटकरे काय पलटवार करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 



रामदास कदमांची रवींद्र चव्हाणांवर टीका


रायगड पाठोपाठ कोकणात महायुतीतील वाद विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, असा हल्लाबोल करत देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रामदास कदमांनी केली आहे. गेल्या 14 वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम होत नाही. चाकरमान्यांचे हाल होत आहेत. समृद्धी महामार्ग 3 वर्षात होतो. मग हा महामार्ग का नाही? असा प्रश्न रामदास कदमांनी उपस्थित केला. रवींद्र चव्हाणांना शिवसेनेची एलर्जी आहे. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, अशी टीका त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर केली आहे. 


जगदीश मुळीकांनी मिटकरींची लायकी काढली


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला जुन्नरमधील नारायणगावमध्ये भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. यावरून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा आणि आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत देवेंद्रजींनी तात्काळ खुलासा करावा, असे त्यांनी म्हटले. यावरून भाजप नेते जगदीश मुळीक यांनी अमोल मिटकरी यांना डिवचले आहे. ए मिटकरी, तुझी पात्रता आहे का? मा. देवेंद्रजींना खुलासा मागण्याची शेवटी तू बाजारु विचारजंतच, तुझी पात्रता तेवढ्याच डबक्यात राहणार!, असे ट्विट करत मुळीक यांनी मिटकरी यांची थेट लायकीच काढली आहे. 


आणखी वाचा 


Maharashtra Assembly Election 2024: मोदींना महाराष्ट्रातील बदलत्या वाऱ्याचा अंदाज आलाय, निवडणूक असूनही महाराष्ट्रात येणं टाळतायत: रोहित पवार