मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना महिला व बालविकास विभागातर्फे सुरु करण्यात आली होती. या योजनेतून जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंतच्या सहा हप्त्यांची रक्कम 1500 रुपयांप्रमाणं पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याचं आश्वासनं दिलं होतं. त्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच दरम्यान महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जीआरचा संदर्भत देत एक आठवण करुन दिली आहे. त्यानुसार पात्र महिलांना दरमहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पूर्णपणे 1500 रुपये मिळणार नसून केंद्र राज्य योजनांचा थेट लाभ मिळत असल्यास आणि ती रक्कम 1500 पेक्षा कमी असल्यास दोन्ही मध्ये जितका फरक असेल ती रक्कम महिलांच्या खात्यात जमा होईल.
मंत्री आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी निकषात बसलेल्या लाभार्थ्यांना धक्का लागणार नाही असं म्हटलं. निकषापलीकडे ज्या तक्रारी आल्यात त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या. योजनेबद्दल माहिती सांगताना त्या म्हणाल्या की आपल्याकडे नमो शेतकरी योजना आहे. आमच्या जीआरमध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे. इतर योजनेचा लाभ घेत असाल पण ती रक्कम 1500 पेक्षा कमी असेल तर वरची जी रक्कम आहे. समजा नमो शेतकरी योजनेचा लाभ एक हजार मिळतो. आपल्या योजनेचा लाभ 1500 आहे. त्यांना एक हजारचा लाभ कायम आहे, आपण तो काढू शकत नाही. आपल्याला ती ब्रॅकेट अमाऊंट आहे जी राहते ती 500 ची असेल ती भरुन काढावी लागेल. त्यासाठी संबंधित विभागाशी त्याचं कॉर्डिनेशन करावं लागणार आहे. परिवहनसाठी विभागासाठी चारचाकी वाहनासंदर्भात क्रॉस वेरिफिकेशन करावं लागणार आहे. उत्पन्नासाठी आयटी डीपार्टमेंटसोबत कॉर्डिनेशन करावं लागणार आहे, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं.
जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?
केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे रु.1500/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 28 जून 2024 शासन निर्णयातील अटीनुसार क्रॉस व्हेरिफिकेशननंतर आर्थिक लाभाच्या इतर योजनांचा लाभ घेत असल्यास 1500 पेक्षा फरकाची जी कमी रक्कम असेल ती पात्र लाभार्थ्यांना मिळेल.
इतर बातम्या :