मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून ही योजना राबवली जाते. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा निधी वर्ग केला जातो. ही योजना जुलै 2024 पासून सुरु करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांबाबत पडताळणी विविध विभागांच्या सहाय्यानं केली जाणार आहे. यामध्ये प्राप्तिकर विभाग, परिवहन विभाग आणि राज्य सरकारच्या विविध विभागांकडून थेट लाभाच्या ज्या योजना चालवल्या जातात त्याची माहिती घेऊन पडताळणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 30 लाख महिला अपात्र ठरणार अशाप्रकारचं वृत्त प्रकाशित झालं होतं, या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भूमिका मांडली आहे. ज्या महिलांच्या खात्यात लाभ गेला आहे तो बँक खात्यातून परत घेतला जाणार नाही, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या बातम्या समोर येत आहेत त्या चुकीच्या आहेत. माझी तर सर्व लाडक्या बहिणींनी अफवांना बळी पडू नये. लाभार्थ्यांच्या खात्यातून लाभ परत घेतला नाही, रिफंड केलेला नाही. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी कोणाच्याही खात्यातून पैसे परत घेतलेले नाहीत, घेण्यासंदर्भात चर्चा नाही, असं म्हटलंय. काही वर्तमानपत्रांनी 30 लाख,35 लाख, 40 लाख उद्या म्हणतील एक कोटी, मात्र जी माहिती देण्यात आहे ती चुकीची आहे. महिलांपर्यंत नियमितपणे लाभ पोहोचत आहे, असं आदिती तटकरे म्हणाल्या.
महिला काही स्वयंस्फूर्तीनं लाभ सोडण्यासंदर्भातील अर्ज देत आहेत. अंगणवाडी सेविका, तालुकास्तरीय, जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांकडे अर्ज देत आहेत. ऑगस्ट, ऑक्टोबर महिन्यातही महिला स्वयंस्फूर्तीनं समोर येत आहेत. जीआरमध्ये बदल करण्यात आलेला नाही, असं आदिती तटकरे म्हणाल्या, त्या बीबीसी मराठी सोबत बोलत होत्या.
30 लाखांचा आकडा विभागाला मला, मंत्री म्हणून मला, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही. विरोधकांच्या सोशल मीडिया खात्यावरुन वृत्तपत्रांकडे 30 लाखांचा आकडा आला की काय असं आदिती तटकरे म्हणाल्या. निकषात न बसणाऱ्या महिलांबाबत अधिकृत निर्णय झाला नसला तरी सांगू इच्छिते ज्या महिलांना लाभ गेलाय त्यांच्या खात्यातून परत घेतला जाणार नाही, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.
जानेवारीत 2 कोटी 41 लाख महिलांना लाभ
राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या लाभाचं वितरण सुरु आहे. 24 जानेवारी 2025 रोजी 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी वर्ग करण्यात आला. त्यानंतर 25 जानेवारीला 1.31 कोटी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात जवळपास 2.41 कोटी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा लाभ जमा झाला आहे.
इतर बातम्या :