बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणानंतर आता मोठ्या प्रमाणावर गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत,त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुरेश धस (Suresh Dhas) यांनी सुरवातीपासून आपली बाजू परखडपणे मांडली आहे. अशातच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आरोप करत एका पोलिस कर्मचाऱ्याचा विष्णू चाटेशी (Vishnu Chate) संबंध असल्याचं सांगत, त्यांचाही काही अवैध कामांमध्ये समावेश असल्याचा दावा केला आहे.
बीड जिल्हा पोलिस दलातील भास्कर केंद्रे हा कर्मचारी 15 वर्षापासून परळीतच आहे. त्याच्याकडे 15 जेसीबी आणि 100 टिप्पर आहेत. यामधून तो राखेची अवैध वाळू वाहतूक करत आहे. तसेच मटक्यावाल्याशीही त्याची पार्टनरशिप आहे, तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या नावाने परळीतून 46 कोटी रुपयांचे बिले काढल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
त्याचबरोबर परळी ग्रामीण, परळी संभाजीनगर, सिरसाळा आणि बर्दापूर पोलिस ठाण्यात 10 ते 17 वर्षापासून पोलिस एकाच ठिकाणी आहेत. त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करावी. वाल्मिक कराड याला फरार होण्यासाठी कोणी कोणी मदत केली, त्यांची नावे पोलिसांना दिली आहेत. पोलिसांनी त्यांना सहआरोपी करावं. परळी नगरपालिकेचे स्पेशल ऑडिट करावं. कारण एका व्यक्तीच्या नावावर 45 कोटी रुपयांची बिले काढली आहेत. यात विष्णू चाटेचाही समावेश आहे. एकाच रस्त्यावर पाच-पाच वेळा बिले काढल्याचेही आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
अजित पवार सकाळीच बीडमध्ये दाखल
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे, त्यानंतर ते आज (गुरुवारी) पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर आले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बीडमध्ये पोहोचले. यावेळी अजित पवार यांच्या स्वागतासाठी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे जातीने हजर होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही याठिकाणी मोठी गर्दी केली होती. याशिवाय, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडितही अजितदादांच्या स्वागताला उपस्थित होते. अजित पवार आता बीडच्या (Beed News) शासकीय विश्रामगृहावर जातील. यानंतर ते पालकमंत्री म्हणून बीडच्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीला हजेरी लावणार आहेत.
जिथे तथ्य नसेल तिथे कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही - अजित पवार
बीडमध्ये बोलताना अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य केलं आहे. तथ्य असेल तरच कारवाई केली जाईल ज्यामध्ये तथ्ये नसेल तिथे कारवाई करण्याचा प्रश्नच येत नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर त्यांनी चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही म्हणत अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला तंबी दिली आहे.