भारतातील टॉप उद्योगपती मुकेश अंबानी-गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, जाणून घ्या संपत्ती नेमकी किती?
Mukesh Ambani And Gautam Adani : भारतातील दोन प्रमुख उद्योजक मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे. ब्लूमबर्गचा एक रिपोर्ट समोर आला आहे.
नवी दिल्ली : भारतातील दोन प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे. दोन्ही उद्योगपतींसाठी 2024 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरलं. ब्लूमबर्गच्या ताज्या रिपोर्टनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी हे दोघे 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर पडले आहेत. दोन्ही उद्योगपतींच्या संपत्तीत गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती.त्यामुळे दोन्ही उद्योजक या क्लबमधून बाहेर पडले आहेत.
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत घट का झाली?
रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांची संपत्ती जुलै 2024 मध्ये 120.8 अब्ज डॉलर्स इतकी होती. डिसेंबरमध्ये 2024 मध्ये ती 96.7 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमधील घसरणीचं कारण प्रामुख्यानं रिटेल आणि ऊर्जा विभागतील कंपन्यांच्या कमजोर कामगिरीमुळं आणि वाढत्या कर्जामुळं घटली आहे. अंबानी यांच्या कंपन्याच्या व्यापारदृष्ट्या विस्ताराबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती जुलैमध्ये त्यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नावेळी जितकी होती त्यापेक्षा 24 अब्ज डॉलर्सनं घटली आहे.
गौतम अदानी यांच्या संपत्तीत घसरण होण्यामागं अमेरिकेतली न्याय विभागाकडून करण्यात येणारी चौकशी आणि हिंडनबर्ग रिसर्चचा रिपोर्ट ही दोन प्रमुख कारणं आहेत. हिंडनबर्ग रिपोर्टनं अदानी समुहाबाबत केलेल्या दाव्यानंतर अदानी उद्योग समुहाच्या विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. जून 2024 मध्ये गौतम अदानी यांची संपत्ती 122.3 अब्ज डॉलर्स इतकी होती. सध्या ती 82.1 अब्ज डॉलर्स इतकी राहिली आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्ट नुसार भारतातील टेलिकॉम कंपन्यांवर दबाव असल्याचं पाहायला मिळतं. अमेरिकेतील नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणं आणि एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंक भारतात आल्यास टेलिकॉम कंपन्यांसमोर आव्हान निर्माण होणार आहे.
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं?
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत वॉलमार्टची मालकी असलेलया वाल्टन कुटुंबाकडे 432 अब्ज अमेरिकन डॉलर्सची संपत्ती आहे. मुकेश अंबानी या यादीत 8 व्या स्थानावर आहेत.
मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत झालेली घट ही भारतीय उद्योग जगतामधील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. गुंतवणूकदार आणि उद्योग विश्वातील जाणकारांच्या मते दोन्ही उद्योगपतींनी त्यांचं आर्थिक साम्राज्य स्थिर करण्यासाठी धोरणात्मक पावलं उचलावी लागणार आहेत.
इतर बातम्या :