Monsoon 2023:  मान्सून (Monsoon) हा भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेत आणि शेतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जर मान्सून चांगला असेल तर पिकाचे उत्पादन चांगले आले असते.  तर मान्सूनच्या अपयशामुळे कृषी क्षेत्रावर वाईट परिणाम होतो. कृषी क्षेत्रातील नकारात्मकतेचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून येतो.


हवामान खात्याचा अंदाज काय? 


शेतीसाठी महत्त्वाचा असलेला नैऋत्य मोसमी पाऊस लांबला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उत्तर भारतात मान्सूनचे आगमन होण्यास अद्याप आठवडाभराचा उशीर होऊ शकतो. मात्र, भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे की यावर्षी मान्सूनचा पाऊस सामान्य असणार आहे.


सिंचनासाठी मान्सून महत्त्वाचा


हवामान खात्याने जूनच्या सुरुवातीला चार महिन्यांच्या मान्सूनचा अंदाज जारी केला होता. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनची दीर्घकालीन सरासरी 96 ते 104 टक्के असू शकते. हे प्रमाण सामान्य मान्सूनचे लक्षण आहे. मान्सूनचा पाऊस हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचा आहे, देशाच्या अर्ध्याहून अधिक शेतीयोग्य जमिनीचे सिंचन यावर अवलंबून आहे. अशा प्रकारे मान्सूनचा थेट संबंध खाद्यपदार्थांच्या भाववाढीशी असतो.


रिझर्व्ह बँकेला भीती 


सध्या मान्सून लांबल्याने खरीप पिकांच्या पेरण्या उशिराने सुरू झाल्या आहेत. मान्सूनचा पाऊस अपेक्षेपेक्षा चांगला झाला नाही, तर खरीप पिकांचे उत्पन्न कमी राहू शकते. त्यामुळे आगामी काळात खाद्यपदार्थांच्या किमती वाढू शकतात. अशा स्थितीत महागाईच्या आघाडीवर काही महिन्यांपासून सातत्याने दिलासा मिळत असल्याने होणारा फायदा नागरिकांना मिळणार नाही. रिझर्व्ह बँकेनेदेखील याबाबतची भीती व्यक्त केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या महिन्यात झालेल्या एमपीसीच्या बैठकीनंतर, एल निनोमुळे आगामी काळात महागाईच्या आघाडीवर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती वर्तवली होती. मागील काही महिन्यांपासून महागाई दर नियंत्रणात असल्याने रेपो दर स्थिर आहे. महागाई दर कमी राहिल्यास रेपो दरातही घट होण्याची शक्यता आहे. महागाई दर वाढल्यास कर्जाचे हप्ते महाग राहण्याची भीती आहे. 


मान्सूनचा परिणाम?


मान्सूनच्या पावसाचा संबंध हा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर अधिक परिणाम करणारा आहे.  मान्सूनचा मोसम वाईट गेल्यास ग्रामीण भागातील मागणीत घट होते. याचा परिणाम अनेक क्षेत्रावर होतो. यात मुख्यत: उपभोग आधारीत क्षेत्रावर (consumption-based sector) अधिक होतो. उपभोग क्षेत्रात खाद्यान्न, कपडे, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणे आदींचा क्षेत्राचा समावेश होतो. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: