Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली. मात्र, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं अर्जदारांचं टेन्शन वाढलं आहे.

Mhada Pune Lottery Problems मुंबई: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 4462 घरांच्या विक्रीसाठी सोडत काढण्यात आली आहे. या लॉटरीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 22 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवण्या आली आहे. डोमिसाईल आणि उत्पन्नाचा दाखला यांची पडताळणी व्हायला वेळ लागत असल्यानं मुदतवाढ देण्यात आल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान महा आयटीच्या सेवा बंद राहणार असल्यानं म्हाडाची अर्ज प्रक्रिया देखील प्रभावित झाली आहे. महा आयटीच्या सेवा उपलब्ध नसल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाचे दाखले मंजूर करण्यात येत नसल्याचा मेसेज अर्जदारांना ऑनलाईन सिस्टीम्समध्ये दिसत असल्यानं 22 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येईल का असा सवाल अर्जदार करत आहेत.
म्हाडाकडून मुदतवाढ पण अर्ज प्रक्रिया रखडली
पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत 4462 घरांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता अर्ज सादर करण्यास 22 ऑक्टोबर 2026 रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, 16 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत महा आयटी सेवा उपलब्ध नसल्यानं अर्जदारांची डोमिसाईल आणि उत्पन्नाचा दाखले मंजूर होत नसल्यानं अर्जदारांची चिंता वाढली आहे. 20 ऑक्टोबर नंतर राहिलेल्या दोन दिवसांच्या कालावधीत उत्पन्नाचे दाखले आणि डोमिसाईल मंजूर झाल्यानंतर डिपॉझिट रक्कम जमा करुन अर्ज दाखल करणं शक्य होईल असा प्रश्न अर्जदारांकडून उपस्थित होतोय. त्यामुळं 22 ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा पुणे लॉटरीसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ मिळणार याकडे सर्व अर्जदारांचं लक्ष लागलं आहे.
डोमिसाईल प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला Maha IT कडून पडताळणीच्या प्रक्रियेला वेळ लागत असल्यानं अर्जदारांच्या विनंतीचा विचार करुन 22 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आलं होतं. आता महाआयटीच्या सेवा उपलब्ध नसल्यानं पुन्हा मुदतवाढ दिली जाणार का असा प्रश्न अर्जदारांच्या मनात आहे.
दरम्यान, पुणे लॉटरीला पुणेकरांकडून जोरदार प्रतिसाद मिळालेला आहे. 14 ऑक्टोबरपर्यंत सोडतीसाठी पुणे लॉटरीसाठी 1,67,570 अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह 104086 अर्ज प्राप्त झाले होते.
म्हाडाची घरं कोणत्या भागात?
पुणे येथील मांजरी खुर्द , म्हाळुंगे, भूगाव येथील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीतील धानोरी, वारजे, कात्रज, हडपसर, पाषाण, खराडी, बाणेर, धायरी, लोहगाव, बिबडेवाडी, मुंढवा, ऊंड्री, वडगाव, बावधन, कोंढवा खुर्द येथे घरं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी, किवळे, डुडूळगाव, ताथवडे, वाकड, चिखली, रावेत, पुनावळे, वाकड, बालेवाडी, रहाटणी, वडमुखवाडी, मानुर्डी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव येथील घरं विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
महत्त्वाच्या बातम्या























